- अपर्णा वेलणकर
जयपूर : सत्ताधारी पक्षाला गैरसोयीचा वाटणारा प्रत्येक विचार सरसकट ‘देशद्रोह’ ठरवण्याचा उन्मत्तपणा कॉंग्रेसला अमान्य आहे. हिंसेला उघड उत्तेजन आणि देशाच्या सार्वभौमत्वाला हानी पोचेल असे वक्तव्य हे अपवाद वगळता मतस्वातर्याचा, मुक्त अभिव्यक्तीचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. काँग्रेसला केंद्रात सत्तेवर परतण्याची संधी मिळाल्यास या देशात कोणतेही पुस्तक निषेध म्हणून जाळले जाणार नाही आणि कोणताही चित्रपट बंद पाडू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट हमी कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी येथे दिली.जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत थरूर बोलत होते.
कॉंग्रेसच्या जाहीरनामा समितीचा सदस्य म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी पक्षाची भूमिका ठरवण्याची जबाबदारी आपण स्वीकारली असून त्यासाठी देशभरातल्या लेखक-कलावंतांच्या भेटीगाठी सुरू असल्याची माहितीही थरूर यांनी दिली. ज्या कलाकृतीवर बंदी घालण्याची मागणी होते, त्या मागणीतले तथ्य सिद्ध करण्याची जबाबदारी बंदीच्या पुरस्कर्त्यांवर असली पाहिजे, त्या ऐवजी त्या कलाकृतीच्या निर्मात्यावरच दबाब आणला जातो, ही मुस्कटदाबी भारतात चालू देता कामा नये. याची जबाबदारी केंद्राबरोबरच राज्य सरकारे आणि अर्थातच न्यायालयांनीही संवेदनशीलतेने निभावली पाहिजे, असेही थरूर म्हणाले.
करदात्यांचा पैसा मनमानीपणे उधळून स्वत:ची प्रसिद्धी विकत घेण्याचे नरेंद्र मोदी सरकारचे ‘कौशल्य’ जनतेला उमगत नाही, अशा भ्रमात भाजपाने न राहिलेले बरे, असा टोला लगावून थरूर म्हणाले, प्रियांका गांधी यांच्या राजकारण-प्रवेशावर विचार आणि वक्तव्ये करण्यात भाजपाने एवढा वेळ गमावण्याचे कारण नाही. त्यांनी आपल्या पक्षाचे बघावे, आम्ही आमचे पाहून घेऊ!’
प्रियांका, राहुल...आणि स्पर्धाभारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात बदलांनी वेग घेतला असून पक्षकार्याची जबाबदारी स्वीकारून राजकारणात सक्रीय झालेल्या प्रियांका गांधी हे त्या बदलाचे समर्थ प्रतिक असल्याचे शशी थरूर म्हणाले.भविष्यात प्रियांका गांधींचे काम उत्तर प्रदेशपुरते मर्यादित राहाणार नाही हे उघड असले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसारख्या संवेदनशील राज्यावर त्या अधिक लक्ष केंद्रीत करतील. सामान्य लोकांशी असलेला ‘कनेक्ट’, तरुण मतदारांमधली लोकप्रियता, स्थानिक भाषेच्या लहेजावरले प्रभुत्व आणिअर्थातच व्यक्तिगत करिश्मा ही प्रियांका गांधींची बलस्थाने त्यांच्या उज्ज्वल राजकीय भविष्याची खात्री देतात, असे थरूर म्हणाले.प्रियांकांचे औपचारिक आगमन म्हणजे राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या वाटेतला अडथळा नाही का, या प्रश्नावर थरूर म्हणाले, कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष एकच आहेत. त्यांना कसली स्पर्धा?