ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 24- भारतीय नागरिकांनी आपला प्रत्येक सणाला पाकिस्तानचा झेंडा जाळावा आणि पाकचा झेंडा जाळून सण साजरे करावे. ते प्रत्येकाचं कर्तव्यच आहे," असं वक्तव्य भाजपाचे आग्रा शहराचे महापौर इंद्रजीत आर्य यांनी केलं आहे. युट्यूबवर इंद्रजीत आर्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत ते जनतेला सणाच्या वेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्याचं आवाहन करत आहेत. वाराणसीतील हिंद-बलोच फोरमनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना आर्य यांनी हे आवाहन केलं आहे. याच कार्यक्रमाच्या दरम्यान हा व्हिडिओ शूट झाला आहे. चार दिवसांआधी हा कार्यक्रम झाला होता. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. "बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यात भारताची भूमिका" या विषयावर २० जून रोजी एका चर्चेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आर्या यांनी पाकिस्तानवर ही टीका केली आहे..
आमचे जवान शेजारी देशाला सीमेवर सडेतोड उत्तर देत आहेत. अशा वेळी आपणही काहीतरी कृती करून पाकला योग्य संदेश द्यायला हवा. फक्त सणाच्या दिवशी नाही तर, प्रत्येक कार्यक्रमाआधी पाकचा झेंडा जाळला गेला पाहिजे. तसं झालं तर पाकिस्तान ज्यांना आपलासा वाटतो अशी लोक आपोआप वेगळी पडतील आणि पाकलाही धडा मिळेल, अशी प्रतिक्रिया आग्रा शहराचे महापौर इंद्रजीत आर्य यांनी द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिली आहे.
इतकंच नाही, तर प्रत्येकाने आपल्या मुलालासुद्धा असं करायला शिकवलं पाहिजे. काश्मीरच्या नावावर पाकिस्तान दहशतवादी कारवाया करत. भारत-चीनमध्ये भांडणं लावण्याची कामं पाककडून केली जातात. आपणही त्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून हे करायला हवं. त्यासाठी आम्ही देशभरात मोहीम राबवणार आहोत. जोपर्यंत आपण एकजूट होत नाही. आपला राग व्यक्त करत नाही, तोपर्यंत त्यांना धडा मिळणार नाही, असंही आर्य यांनी म्हंटलं आहे.
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात इंद्रजीत आर्या यांनी पुन्हा दोन वर्षानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. 2012मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर महापौर पदाची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. पण त्यानंतर 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी ते समाजवादी पक्षात गेले होते.