जळीत प्रकरण
By admin | Published: July 31, 2015 11:55 PM
पत्नीला जाळणाऱ्या
पत्नीला जाळणाऱ्यापतीची निर्दोष सुटकानागपूर : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर चिटणीसपुरा येथे पत्नीला रॉकेलने जाळून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका पतीची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. विकास इंगळे, असे आरोपीचे तर शिल्पा विकास इंगळे (२५), असे जखमी महिलेचे नाव आहे. १५ जानेवारी २०१४ रोजी विकासने आपली पत्नी शिल्पा हिच्या अंगावर रॉकेल ओतून जाळले होते. जखमी अवस्थेत शिल्पाला मेडिकल कॉलेज इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. शिल्पाच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी भादंविच्या ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. युक्तिवादात बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले की, हे प्रकरण आत्महत्येचे असून खुनाचा प्रयत्न केल्याचे नाही. सरकार पक्षाने जखमी महिलेच्या मुलीचेही बयाण नोंदवलेले नाही. बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरीत संशयाचा लाभ देऊन न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. मनमोहन उपाध्याय, ॲड. प्रमोद उपाध्याय तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील उषा गुजर यांनी काम पाहिले.