भोपाळ – मध्य प्रदेशातील सीधी येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत ३९ जणांचा मृतदेह सापडला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारने सर्व कार्यक्रम स्थगित केले असून मयताच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मध्य प्रदेश सरकारचे मंत्री तुलसीराम सिलावट आणि रामखेलावान पटेल हे दोघंही घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Several died while several others remained missing after a bus fell off a bridge into a canal in Madhya Pradesh's Sidhi district)
परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी घटनेची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान(CM Shivraj Singh Chouhan) यांना दिली आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या बसमध्ये ५५ ते ६० प्रवाशी प्रवास करत होते, यातील ७ जणांना जिवंत वाचवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत ३९ जणांचा मृतदेह सापडला आहे. छुहिया घाट परिसरात वाहतूक कोंडी असल्याने बसने मार्ग बदलला, त्यानंतर पूलाजवळ असलेल्या खड्ड्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस खाली कालव्यात कोसळली.
हा कालवा खूप मोठा आहे, त्यामुळे तातडीने बंधाऱ्यातून सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलं आहे, बचावकार्यासाठी शोधपथक रवाना केले आहेत, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि एसडीआरएफ टीम घटनास्थळी पोहचली आहे, बस बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सध्या घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. बसमध्ये सर्वाधिक नर्सिंगचे विद्यार्थी होते, जे परीक्षा देण्यासाठी सीधी ते सतना जात होते, परंतु या बस अपघातात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात जीव गेला.
दरम्यान, या बसमध्ये नेमके किती प्रवाशी होते त्याची अधिकृत माहिती समोर आली नाही. स्थानिक लोकांनी प्रशासनावर मदत उशीरा पाठवल्याचा आरोप केला आहे. परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी बसचा परवाना रद्द केला आहे, बसमध्ये विद्यार्थी परीक्षेला जात होते, चुकीच्या मार्गाने बस जात होती, परिवहन आयुक्त या संपूर्ण अपघाताची सखोल चौकशी करतील आणि दोषींवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असं परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे.