जयपूर - सवाई माधोपूर येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. बनास नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली मीनी बस नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 32 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोक जमा होण्यास सुरुवात झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सवाई माधोपूर येथून लालसोटसाठी रवाना झाली होती. बसमध्ये जवळपास 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. बस बनास नदीवरील पुलावर पोहोचताच खाली नदीत कोसळली. नदीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची संधी मिळालीच नाही. दुर्देवी अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. सवाई माधोपूर येथून जवळपास 20 किमी अंतरावर ही दुर्घटना झाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक आणि चार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.
जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात पोहोचवलं जात आहे. रुग्णालयाबाहेर लोकांची आणि नातेवाईकांची गर्दी जमा झाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्या कारणाने चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला.