दोडा : घाट पार करताना प्रवाशांना रस्त्याच्या कडेने जात असतानाच बस थेट ३०० फूट खोल दरीत कोसळल्याची भीषण दुर्घटना जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात घडली. बुधवारी सकाळी ११.५० वाजताच्या या घटनेत ३८ प्रवासी ठार झाले असून २० जण जखमी झाले. किश्तवाडहून जम्मूला जाणाऱ्या या बसमध्ये ५८ जण होते, अशी माहिती आहे. राष्ट्रीय महामार्गावर त्रिंगुल-आसारजवळ हा अपघात झाला. त्यानंतर बचावरकार्य जोरात सुरू होते. त्यातील काही मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दोडाचे उपायुक्त हरविंदर सिंग यांनी सांगितले की, आम्ही या बसची संपूर्ण माहिती घेतली. बस योग्य प्रकारे चालवली जात नव्हती. पहिल्यांदा ती अपघातरोधी कठड्याला धडकली. नंतर ती बस दरीत कोसळी, असेही त्यांनी सांगितले. दुर्दैवी दुर्घटनेत मृत पावलेल्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुःख व्यक्त केले. मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार मदत दिली जाईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.
बसमध्ये अतिरिक्त प्रवासी : अपघातग्रस्त बसमध्ये अतिरिक्त प्रवासी होते. घाटात बसला यू-टर्न घ्यायचा होता. ते करत असताना बसने रस्ता सोडला आणि ती थेट घाटात कोसळली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.