कन्नौज : उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात एका बस ड्रायव्हरने शेवटच्या श्वासापर्यंत आपला कर्तव्य निष्ठेनं बजावलं. अगदी मृत्युच्या दारात उभा असतानाही प्रवाशांना सुखरुप ठेऊनच या बस ड्रायव्हरने जीव सोडला. येथील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर प्रवाशाना घेऊन जात असताना अचानक एका बसच्या ड्रायव्हरला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. चालत्या बसमध्ये हा प्रकार घडल्याचे पाहून बसमधील प्रवाशांमध्ये भीती पसरली. मात्र, संतराजरामने प्रसंगावधान राखत कशीबशी रस्त्याच्या कडेला बस थांबवली. त्यानंतर, काही वेळातचं रक्ताच्या उलट्या करुन ड्रायव्हरने आपले प्राण सोडले. आपल्या नावाला साजेल असं काम करन संतराजरामने अखेरचा श्वास घेतला.
मरावे परी किर्ती रुपी उरावे, या म्हणीचा साक्षात्कार एका बस ड्रायव्हरने करुन दाखवला. आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर जौनपूरहून दिल्लीला जात असलेल्या या रोजवेज बसमध्ये ड्रायव्हर संतराजराम याची तब्येत अचानक बिघडली. या दरम्यान, ड्रायव्हला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. चालत्या बसमध्येच ड्रायव्हरची तब्येत बिघडल्याचे पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, ड्रायव्हरने स्वत:ला कसेबसे सावरले. गाडीतील 56 प्रवाशांचा विचार आपल्या डोक्यात ठेऊन ड्रायव्हरने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर, गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडला, तेथे रक्ताच्या उलट्या होऊन ड्रायव्हरे जीव सोडला. आपल्यावरील संकटाची चाहुल लागताच, ड्रायव्हरने गाडीतील प्रवाशांच्या जीवाची पर्वा करुन आपला ड्रायव्हरकीचा धर्म निभावला.
बसचे परिचालक दीपक कुमार यांनी घटनेची माहिती देताना म्हटले की, 56 प्रवाशांना घेऊन ही बस जौनपूरच्या शाहगंज येथून दिल्लीसाठी रवाना झाली होती. काही वेळ लखनौमध्ये थांबली. त्यानंतर आम्ही कन्नोजला पोहोचलो. ही बस कन्नौज सौरिख भागात आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ताशी 65 ते 70 प्रती किमीच्या वेगाने धावत होती. अचानक ड्रायव्हरने बसला ब्रेक लावला आणि बस थांबवली. त्याने दरवाज उघडताच त्याचा रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला.
बसचालकाने प्रसंगावधानता दाखवल्याने बसमधील 56 प्रवाशांचा जीव वाचला. त्यामुळे, प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, बस ड्रायव्हरच्या मृत्युमुळे प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली.