हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (HRTC) बसचा मोठा अपघात झाला आहे. चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी HRTC ची बस ३०० फूट दरीत कोसळली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून उर्वरित लोकांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्त्यावरून खाली कोसळल्यानंतर सुदैवाने बस झाडाला जाऊन थडकली अन् मोठा अपघात टळला. बस कारसोगहून मेहंदी ज्वालापूरकडे जात होती.
दरम्यान, स्थानिक खरोडी गावाच्या ठिकाणी बसचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या खाली गेली. बस खाली पडल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना आपल्या वाहनांतून जवळच्या कारसोग रुग्णालयात नेले. जखमींमध्ये फक्त चालकाला जास्त दुखापत झाली आहे. उर्वरित जखमींना किरकोळ जखमा झाल्या आहेत. प्रशासनाचे अधिकारी येण्यापूर्वीच स्थानिक लोकांनी जखमींना बाहेर काढून त्यांच्याच वाहनातून रुग्णालयात नेले.
स्थानिकांचा प्रशासनावर आरोप महामंडळाच्या बसेसच्या दररोज ब्रेकडाउन होत असून रस्त्याच्या कडेला पॅरापेटची व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दुसरीकडे तहसीलदार कैलाश कौंडल यांनी सांगितले की, बस अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारणही तपासले जात आहे.