ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - वैद्यकीय क्षेत्रात औषधोपचारांसाठी रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारले जाते, शस्त्रक्रिया, तसेच इतर उपकरणे आणि वैद्यकिय साहित्यासाठी रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली केली जाते, ही बाब सर्वश्रुत आहे. आता शरीरातील वाहिन्यांचे आकुंचन रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटची किंमत उत्पादकाकडून रुग्णापर्यंत पोहोचेस्तोवर दहा पटीने वाढते हे अधिकृतरित्या समोर आले आहे. राष्ट्रीय औषधोत्पादन मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्टेंटच्या विक्रीमध्ये 270 ते एक हजार टक्के एवढी अवास्तव नफेखोरी होत असल्याचे उघड झाले आहे.
अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रियांमध्ये स्टेंटचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे त्याची चढ्या दरात विक्री होत असते. आता समोर आलेल्या आकडेवारीत रुग्णालये स्टेंटच्या विक्रीत सर्वाधिक नफेखोरी करतात असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार रुग्णालयांकडून स्टेंटची रुग्णांना विक्री करताना सुमारे 650 टक्के नफावसुली केली जाते. स्टेंटची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांबरोबरच रुग्णालये आणि कार्डिओलॉ़जिस्ट स्टेंटची किंमत निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
स्टेंटचे उप्तादन करणाऱ्या कंपन्यांकडून मिळालेली आकडेवारी आणि विक्री करणाऱ्या ठिकाणची आकडेवारी यावरून एनपीपीएने हा निष्कर्श काढला आहे. त्यानुसार या नफेखोरीची टक्केवारी 270 ते एक हजारपर्यंत पोहोचते.