ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - व्यापार, उद्योगासाठी अनुकूल असलेल्या देशांमध्ये भारताच्या क्रमवारीत सलग दुस-यावर्षी सुधारणा झाली आहे. जागतिक आर्थिक फोरमने तयार केलेल्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारताच्या क्रमवारीत १६ स्थानांची सुधारणा होऊन भारत ३९ व्या स्थानावर आला आहे.
सलग दुस-यावर्षी भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. एकूण १३८ देशांच्या यादीत दक्षिण आशियाई देशांमध्ये पाकिस्तान सर्वात शेवटच्या १२२ व्या स्थानावर आहे. श्रीलंका ७१, नेपाळ ९८, भूतान ९७ आणि बांगलादेश १०६ व्या स्थानावर आहे.
मोदी सरकारसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. २०१५-१६ मध्ये भारत ५५ व्या स्थानावर होता. एकूण १२ मुद्दे विचारात घेऊन जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकाची क्रमवारी ठरवली जाते. यात उद्योगाच्या नव्या संकल्पना, आधुनिकीकरण, वस्तू बाजारपेठ, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि अन्य मुद्यांचा समावेश आहे. एकूणच भारताच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात ब्रिक्स देशांमध्ये चीन पाठोपाठ भारत दुस-या स्थानावर आहे. चीनला २८ वे स्थान मिळाले आहे.