व्यापमं घोटाळा : काँग्रेसचा आरोप उमा भारतींचे मौन
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
उज्जैन : मध्यप्रदेशातील कोट्यवधीच्या व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यात तपास संस्थांकडून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांना जास्तीत जास्त गोवण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल काँग्रेसच्या आरोपावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास खुद्द भारती यांनी मंगळवारी नकार दिला.
उज्जैन : मध्यप्रदेशातील कोट्यवधीच्या व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यात तपास संस्थांकडून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांना जास्तीत जास्त गोवण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल काँग्रेसच्या आरोपावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास खुद्द भारती यांनी मंगळवारी नकार दिला. शिवरात्र उत्सवानिमित्त येथील महाकालचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या जलस्रोत व नदी विकासमंत्री उमा भारती यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा या मुद्यावर आपण तूर्तास काहीही बोलणार नाही. योग्य वेळी पत्रकाद्वारे संपूर्ण चित्र स्पष्ट करू, असे त्यांंनी सांगितले. पत्रक केव्हा काढणार? असे विचारले असता लवकरच असेही त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी या घोटाळ्यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यावर कडाडून हल्ला चढविला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांचा बचाव करण्यासाठी मूळ एक्सेल शीटसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला होता. तपास संस्थांनी भारती यांची भूमिका नाहक वाढवून दाखविली, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांचे म्हणणे होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, सुरेश पचौरी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारे यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)-------कुरघोडीचे राजकारणमूळ एक्सेल शीटमध्ये उमा भारती यांच्या नावाचा उल्लेख १० वेळा होता; परंतु शीटसोबत छेडछाड करून तो १७ वेळा करण्यात आला, असा दावा या नेत्यांनी केला आहे. भारती यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच असे करण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे होते. राज्यातील भाजपच्या राजकारणात मुख्यमंत्री चौहान आणि उमा भारती हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात.