Modi Family Dispute : काही दिवसांपूर्वी संपत्तीच्या वादातून रेमंडचे गौतम सिंघानिया आणि विजयपत सिंघानिया यांच्यातील भांडण फार चर्चेत होतं. त्यानंतर गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या वडिलांना घरी आणून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि वादावर पडदा पडला. मात्र आता आणखी एका कुटुंबाचा संपत्तीचा वाद सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. भारतीय व्यावसायिक क्षेत्रात मोठे नाव असलेल्या दिवंगत केके मोदी कुटुंबाच्या ११,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबतचा कौटुंबिक वाद दिवसेंदिवस वाढत आहे. पण आता या प्रकरणामध्ये उद्योगपती ललित मोदी यांचा भाऊ आणि गॉडफ्रे फिलिप्सचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी त्यांची आई बीना मोदी यांच्यावर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी आपल्या भावावर आईमार्फत हल्ला झाल्याचे म्हटलं आहे. हा हल्ला इतका जीवघेणे होता की ललित मोदी यांच्या भावाचा हात आता कायमचा तुटला आहे. समीर मोदी यांनी शुक्रवारी शुक्रवारी दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की, कुटुंबात सुरू असलेल्या संपत्तीच्या वादातून आई बिना मोदी यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. समीर मोदी यांनी त्यांची आई, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि ग्रँडफ्रे फिलिप्सच्या इतर संचालकांवर गंभीर दुखापत केल्याचा आरोप केला. त्यानंतर आता ललित मोदी यांनी भाष्य केलं आहे.
के.के. मोदी यांच्या निधनानंतर मोदी एंटरप्रायझेस ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्यात. या कुटुंबात सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून वाद सुरू आहे. अशातच आता समीर मोदी यांनी आई बीना मोदी यांना मारहाण केल्याचा आरोप केला. समीर मोदींनी आरोप केला की, जेव्हा ते कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले तेव्हा त्याच्या आईने तिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याच्यावर हल्ला करायला लावला. या हल्ल्यात समीर मोदी गंभीर जखमी झाले. यानंतर ललित मोदी यांनी समीर मोदींच्या दाव्याचे समर्थन केलं आहे.
ललित मोदींनी समीर यांची प्लॅस्टर केलेल्या हाताचे हॉस्पिटलमधील फोटो शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या भावाला या अवस्थेत पाहून मनाला खुप दुःख झालं. एका आईने तिच्या सुरक्षा रक्षकाद्वारे मुलाला त्याचा हात कायमचा निकामी होईल अशा प्रकारे मारहाण करणे धक्कादायक आहे. मीटिंगला हजर राहणे हे त्याचे एकमेव पाप होते. या अपराधासाठी सर्व बोर्ड सदस्य दोषी आहेत. माझ्या सहवेदना समीर मोदीसोबत आहेत,” असे ललित मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकारावर समीर मोदी यांनीही भाष्य केलं. "माझ्याच ऑफिसमध्ये माझ्यावर हल्ला होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. कंपनी संदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. पण आता मी माझे स्टेक अजिबात विकणार नाही. मला बोर्डातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो पूर्ण होणार नाही," असे समीर मोदी यांनी म्हटलं.