नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायन्स इंडिस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नव्या घराबाबत सध्या जाेरदार चर्चा सुरू आहे. हे घर आहे लंडनच्या बकिंघमशायरमध्ये आहे. अंबानी कुटुंबीय लवकरच या नव्या घरात वास्तव्यास जाणार असल्याचे बाेलले जाते. अंबानी कुटुंबीयांनी या घरात यंदा दिवाळी साजरी केली. दिवाळीनंतर सर्व कुटुंबीय भारतात परतणार आहे.
लंडन येथील बकिंघमशायर येथे अंबानी यांनी ३०० एकरची मालमत्ता खरेदी केली आहे. येथील स्टाेक पार्क या ठिकाणी असलेला आलिशान राजवाडा अंबानी कुटुंबीयांच्या पसंतीस पडला होता. यावर्षीच्या सुरुवातीला तब्बल ५९२ काेटी रुपयांमध्ये ही खरेदी करण्यात आली आहे.
राजवाड्याचा इतिहास
स्टाेक पार्क ही लंडनपासून ४० किलाेमीटर अंतरावर असलेली सुमारे ९०० वर्षे जुनी मालमत्ता आहे. सुमारे ११व्या शतकापासून काही नाेंदी आढळतात. १०६६ पासून जवळपास ५०० वर्षे एका कुटुंबाकडे मालमत्तेचा ताबा हाेता. १५८१ मध्ये कर्जबाजारी झाल्यामुळे ती मालमत्ता विकावी लागली.
हेन्री हॅस्टिंग्सने या ठिकाणी एक महाल बांधला हाेता. त्याचे काही अवशेष अजूनही पाहता येतात. १९०८नंतर निक जॅकसन यांनी ती खरेदी केली. त्यांनी या ठिकाणी ब्रिटनमधील पहिल्या कंट्री क्लबची स्थापना केली हाेती. या ठिकाणी भव्य आणि आलिशान पंचतारांकित हाॅटेल आणि रेस्टाॅरंट आहे. याशिवाय स्पा व इतर लक्झरी सुविधा आहेत. ३०० एकरच्या विस्तिर्ण परिसरात २७ होल्सचे भव्य गाेल्फ मैदान आणि १३ टेनिस काेर्ट आहेत. तसेच १४ एकरच्या परिसरात बगीचे आहेत.
सुमारे २३५ वर्षांपूर्वी बांधला आहे राजवाडा
अंबानी कुटुंबियांच्या पसंतीस पडलेला राजवाडा जाॅन पेन यांच्या काळात १७८८च्या सुमारास बांधण्यात आला हाेता. दुसऱ्या जाॅर्जचा वास्तूरचनाकार जेम्स व्याट याने राजवाड्याची बांधणी केली. तर बाहेरील लॅंडस्केप बगीचे व इतर रचना १८व्या शतकातील रचनाकार हम्फ्री रेप्टाॅन याने केली आहे. स्टाेक पार्कचा ताबा राणी एलिझाबेथ प्रथम यांच्या काळात काही कालावधीसाठी ब्रिटीश राजघराण्याकडे हाेता.
तिथे राहायला जाणार नाही; मुंबईत वास्तव्य
रिलायन्स इंडस्ट्रीजने एक निवेदन जारी करून सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. त्यात म्हटले आहे, की अंबानी लंडनमध्ये राहायला जाणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. अंबानी कुटुंबीय लंडन वा जगातील इतर कुठल्याही ठिकाणी स्थलांतरित हाेणार नाही. स्टाेक पार्क इस्टेटमध्ये मालमत्ता खरेदी करण्यामागे असलेला हेतू तेथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला गाेल्फ क्लब व स्पाेर्टिंग रिसाॅर्ट सुरू करणे हा आहे. ही मालमत्ता रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट ॲण्ड हाेल्डिंग या कंपनीने खरेदी केली आहे, असे स्पष्ट केले आहे.