बरेली- रेल्वे रूळ ओलांडताना मोबाइलवर बोलणं एका इंजिनिअरच्या जीवावर बेतलं आहे. मोबाइलवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असताना एक्स्प्रेसने धडक दिल्याने 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. नरेश पाल गंगवार (वय ३०) असं या तरुणाचे नाव आहे. धक्कादायत म्हणजे रविवारी संध्याकाळीच नरेशचे लग्न होणार होतं. नरेश हा नोएडातील एका खासगी कंपनीमध्ये इंजिनिअर पदावर कार्यरत होता.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नरेश रविवारी सकाळी मोबाइल फोनवर बोलत असताना रेल्वे रुळ ओलांडत होता. त्याच्याकडे दोन मोबाइल फोन होते. यातील एका फोनवर तो बोलत होता. तर दुसऱ्या फोनवरुन तो मेसेज करत होता. याचदरम्यान तिथून राज्यराणी एक्स्प्रेस जात होती. फोनवर बोलत असल्याने तसंच दुसऱ्या हातातील फोनमध्ये मेसेज टाइप करत असल्याने त्याचं एक्स्प्रेसकडे लक्ष नव्हतं. यामुळे भरधाव एक्स्प्रेसची नरेशला धडक बसली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी संध्याकाळी नरेश पलचं उमा गंगावर हिच्याशी लग्न होणार होतं. नरेशचं संपूर्ण कुटुंब लग्नाच्या शेवटच्या तयारीत व्यस्त होतं. पण त्याचवेळी त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. मुलाचा एक्स्प्रेसच्या धडकेत सकाळी नऊ वाजता मृत्यू झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांना समजलं.लग्नाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने नरेशचं संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालं आहे. घरात लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. मी त्याच्या लग्नासाठी इथे आलो होतो. पण आता त्याच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला, असं नरेशचा मित्र अनिल गंगावार याने म्हंटलं.
बरेलीतील नंदोशी येथे ही घटना घडली. नरेशचे घर रेल्वे रुळा लगतच होते. ऑफीसमधील एका सहकाऱ्याचा फोन आल्याने नरेश घरातून बाहेर गेला होता. ‘नरेश फोनवर बोलत असल्याने त्याचे एक्स्प्रेसच्या हॉर्नकडे लक्ष गेलं नाही आणि त्याचा मृत्यू झाला’ अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर पोलिसांनीही या प्रकरणाची अपघाती मृत्यूची नोंद केली. ‘ही आत्महत्या नसून अपघात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, मोबाइल फोनमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या देशात वाढली आहे. मे 2014 ते जानेवारी 2016 या काळात एकुण 16 जणांचा रेल्वे रूळावर सेल्फी काढताना अपघात होऊन मृत्यू झाला. तसंच मोबाइलचा वापर रस्ते अपघातांनाही निमंत्रण देतं, असंही एका सर्व्हेतून समोर आलं आहे.