Mamata Banerjee vs Suvendu Adhikari:पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसविरोधात भाजप जोरात तयारीला लागली आहे. त्यात आता राम नवमीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदुत्ववादी संघटना ६ एप्रिल रोजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शोभायात्रा काढणार आहे असून, भाजपने त्याला पाठिंबा दिला आहे. अशात भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केलेल्या एका विधानावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आणि हे दंगली करायला आले आहेत, असे म्हणाल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, "यावर्षी राम नवमीच्या दिवशी कमीत कमी १ कोटी हिंदू पश्चिम बंगालमधील रस्त्यावर उतरतील. २००० शोभायात्रा काढल्या जातील. यात्रा काढण्यासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेऊ नका. रामाची पूजा करण्यासाठी आम्हाला प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही. आम्ही शांत राहू, पण प्रशासनाने हे निश्चित करावं की दुसरे लोकही शांततेत राहतील."
हेही वाचा >>रमजान ईदच्या दिवशी बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट; अंधेरीत सापडले बिश्नोई गँगचे शूटर्स
भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केलेल्या याच विधानावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला. हे दंगल करण्यासाठी आली आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जींनी अधिकारी यांच्यावर टीका केली.
ममता बॅनर्जींची सुवेंदू अधिकारींच्या टीकेवर भूमिका काय?
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी सुद्धा हिंदू आहे. मुसलमान पण आहे, शीख आहे आणि ख्रिश्चन सुद्धा आहे. पण, त्या सगळ्यात आधी मी एक भारतीय आहे. विरोधी पक्षाचे राजकारण फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचे आहे. मी असे होऊ देणार नाही. काही लोक राज्यात दंगली घडवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या चिथावणीला बळू पडू नका", अशी भूमिका ममता बॅनर्जींनी मांडली.
पश्चिम बंगालमध्ये २०२४ मध्ये घडली होती हिंसक घटना
पश्चिम बंगालमध्ये २०२४ मध्ये राम नवमीच्या दिवशी हिंसक घटना घडल्या होत्या. १७ एप्रिल २०२४ रोजी मुर्शिदाबादमधील शक्तिपूरमध्ये राम नवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रेदरम्यान हिंसा झाली होती.
काही लोकांनी छतावरून दगड आणि बॉम्ब फेकल्याचा आरोप केला गेला होता. यात २ मुले आणि पोलिसांसह १८ लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास आधी पोलिसांनी केला. त्यानंतर ते प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आणि नंतर तपास एआयएकडे सोपवण्यात आला होता.