पाटणा : फाशीचे दोर बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बिहारमधील बक्सर कारागृहाला अशा प्रकारचे दहा दोर या आठवड्याच्या अखेरपर्यंत तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. २०१२ साली घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी ही तयारी सुरू असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बक्सर कारागृहाचे अधीक्षक विजयकुमार अरोरा यांनी सांगितले की, फाशीचे दहा दोर १४ डिसेंबरपर्यंत तयार करून ठेवा, असा आदेश कारागृह खात्याकडून आम्हाला मिळाला आहे. त्यांचा वापर नेमका कोणत्या आरोपींसाठी व कुठे होणार आहे, याची मात्र आम्हाला काहीही कल्पना नाही.
फाशीचा एक दोर तयार करण्यासाठी तीन दिवस लागतात. हे दोर हाताने व काही प्रमाणात यंत्रांचा वापर करून बनविले जातात. संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याला बक्सर कारागृहात बनविलेल्या दोरानेच फाशी देण्यात आली होते. २०१६-१७ साली पतियाळा कारागृहाने बक्सर कारागृहाला फाशीचा दोर तयार करून देण्यास सांगितले होते. मात्र, तो कोणत्या आरोपीसाठी वापरला जाणार याची काहीही कल्पना देण्यात आली नव्हती. त्यावेळी फाशीच्या एका दोराची किंमत १७२५ रुपये इतकी आकारण्यात आली होती.
लोखंड व पितळ यांच्या किमतीमध्ये चढ-उतार होत असतात. त्यानुसार फाशीच्या दोराच्या किमती ठरविल्या जातात. या धातूंपासून बनविलेल्या कड्या फाशीच्या दोराला बसविल्या जातात. जेव्हा हा दोर गळ्याभोवती आवळला जातो त्यावेळी त्याची पकड घट्ट ठेवण्याचे काम या कड्या करतात.
दिल्लीतील एका बसमध्ये निर्भयावर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर ही बलात्कार पीडित मुलगी मरण पावली होती. या प्रकरणातील आरोपींना या महिन्याच्या अखेरीस फाशी देण्याकरिता बक्सर कारागृहात दोर तयार केले जात असल्याची चर्चा आहे.
असा बनवितात फाशीचा दोर
सहा ते सात माणसे फाशीचा एक दोर तयार करतात. १५२ धाग्यांनी विणलेला हा दोर हव्या त्या मापामध्ये बनविला जातो. हे दोर कैद्यांकडूनच तयार करून घेतले जातात. फाशीचा दोर तयार करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जाते. हे दोर खूप आधीपासून बनवून ठेवणे उपयोगाचे नसते कारण ते कालांतराने खराब होतात.