कराईकुडी : राफेल विमाने कमी किमतीत मिळत असल्याचा दावा मोदी सरकार करीत आहे, ते जर खरे असेल तर केवळ ३६ लढाऊ विमानेच का खरेदी करण्यात येत आहेत, असा सवाल माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी सोमवारी उपस्थित केला.पत्रकारांना त्यांनी सांगितले की, यूपीए सरकारने १२६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचे ठरविले होते व तसा करारही केला होता. मात्र, एनडीए सरकारने तो करार रद्द करून नवीन करार केला. राफेल विमानांची किंमत पूर्वीपेक्षा किती कमी झाली, हे मोदी सरकारने जाहीर केले पाहिजे. कमी किंमत असूनही फक्त ३६ राफेल विमानेच का खरेदी करण्यात येत आहेत, हा प्रश्न त्यामुळेच उपस्थित झाला आहे.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना संरक्षण खात्यातील खरेदीबाबत अनेकदा काहीच माहीत नसते असा आरोप करून चिदम्बरम म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात संरक्षण मंत्रालयाचा कारभार तीन केंद्रीय मंत्र्यांकडून पाहिला गेला; पण त्यातील एकानेही तो धडपणे केला नाही. राफेल विमान बनविणाऱ्या डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीला भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सची निवड करण्यास भारत सरकारनेच सांगितले होते, असे वक्तव्य फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस ओलांद यांनी नुकतेच केले. त्यावरून भारतात राजकीय वादळ उठले आहे. राफेलच्या मुद्यावरुन राजकारण ढवळून निघाले आहे. राफेलच्या व्यवहारावर बोट ठेवत काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारवर सातत्याने हल्ले चालविले आहेत. दसॉल्ट कंपनीची भागीदार म्हणून भारत सरकारने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सचे नाव सुचवले होते, असे फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलांद यांनी सांगितल्यानंतर तर विरोधकांनी सरकारवरची टीका तीव्र केली आहे.
सरकारकडून मात्र राफेल व्यवहाराचे सातत्याने समर्थन केले जात आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी म्हटले आहे की, भागीदाराची निवड सरकारकडून नव्हे तर उपकरण तयार करणाऱ्या कंपनीकडून होते. तरीही या मुद्यावरुन विरोधकांचे समाधान झालेले नाही. या मुद्यावर मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. (वृत्तसंस्था)मंत्र्यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगतीच्यूपीएच्या कारकीर्दीतील राफेल विमानांच्या किमतीपेक्षा २० टक्के कमी दराने एनडीए सरकार ही विमाने खरेदी करणार आहे, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले होते.च्त्याआधी २०१५ साली तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले की, एनडीए सरकार फक्त ३६ राफेल विमाने विकत घेणार आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा स्वस्तात मिळूनही १२६ ऐवजी ३६ विमानेच का घेतली जात आहेत, असा प्रश्न पडल्याचे चिदम्बरम म्हणाले.