कोची : गुरांच्या बाजारात गाय, बैल, वासरे, उंट अशा जनावरांची कत्तलीसाठी खरेदी-विक्री करण्यास मज्जाव करणाऱ्या केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीस मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली असताना केरळ उच्च न्यायालयाने मात्र या नियमांत नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होईल, असे काहीही नसल्याचे मत व्यक्त करून या नियमावलीस आक्षेप घेणारी जनहित याचिका बुधवारी फेटाळली.युवक काँग्रेसने केलेली याचिका फेटाळताना मुख्य न्यायाधीश न्या. यांच्या खंडपीठाने म्हटले की, केंद्राची नवी नियमावली नीट न वाचल्याने लोकांनी गैरसमज करून घेतले आहेत. या नव्या नियमांनी जनावरे मारण्यास सरसकट बंदी केलेली नाही. विधानसभेचे विशेष अधिवेशनउच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला असताना केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी मात्र या नियमावलीविरुद्ध न्यायालयात जाण्याचे संकेत दिले. या संबधात राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी खास बैठक होणार आहे. तसेच राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशनही भरविण्यात येणार आहे. विजयन यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यांच्या अधिकारवर केंद्राने केलेल्या या अतिक्रमणास एकजुटीने विरोध करण्याचे आवाहन याआधीच केले आहे. आता ते मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्याचाही विचार करीत असल्याचे समजते. (वृत्तसंस्था)तामिळनाडूमध्ये निदर्शनेचेन्नई : केंद्राच्या नव्या नियमाच्या निषेधार्थ डाव्या पक्षांनी तसेच द्रमुकने ठिकठिकाणी निदर्शने केली. मद्रास आयआयटीमध्ये बीफ फेस्टिवल करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभाविपच्या विद्यार्थ्यांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध डाव्या पक्षांनी केला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ८ विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
‘गुरांची खरेदी-विक्री, नियमांत आक्षेपार्ह काही नाही’
By admin | Published: June 01, 2017 1:10 AM