देशातील ७ राज्यांमधील १३ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीतील कामगिरीने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यासंदर्भात विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. "सात राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले आहे की, भाजपने विणलेली भय आणि भ्रमाचे जाळे तुटले आहे. हुकूमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्याची शेतकरी, तरुण, मजूर, व्यापारी, आणि कर्मचाऱ्यांसह प्रत्येक वर्गाची इच्छा आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
एवढेच नाही, तर "अपले जीवन सुधारण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आता जनता पूर्णपणे I.N.D.I.A. सोबत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले. सात राज्यांतील या १३ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकी I.N.D.I.A. ने १० जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला केवळ दोन जागांवरच विजय मिळाला आहे.
पोटनिवडणुकीत I.N.D.I.A. आणि काँग्रेसच्या कामगिरीसंदर्भात बोलताना पक्षाचे अध्यक्ष मल्लकार्जुन खर्गे म्हणाले, हा निकाल म्हणजे मोदी-शहा यांच्या घसरलेल्या राजकीय विश्वासार्हतेचा भक्कम पुरावा आहे. X वर पोस्ट करत ते म्हटले, विधानसभा पोटनिवडणुकीच्या सकारात्मक निकालासाठी आम्ही जनतेसमोर नतमस्तक आहोत. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
तसेच, "काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या मेहनतीसाठी आणि प्रयत्नांसाठी आम्ही त्यांचे अभिवादन करतो. पोटनिवडणुकीतील या विजयामुळे, आता जनतेने भाजपचा अहंकार, कुशासन आणि नकारात्मक राजकारण पूर्णपणे नाकारल्याचे दिसत आहे,” असेही खर्गे म्हणाले.