नवी दिल्ली - आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणकुतीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात गुजरातमध्ये भाजपा तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस बाजी मारताना दिसत आहे. यादरम्यान, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थानसह काही राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या काही जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची दाणादाण उडाली असल्याचे कलांमधून समोर येत आहे. एक लोकसभा आणि ६ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला भोपळा मिळण्याची चिन्हे मतमोजणीतून समोर येत असलेल्या कलांमधून दिसत आहेत.
उत्तर प्रदेशमधील एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाचे उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव यांनी भाजपाचे उमेदवार रघुराज सिंह शाक्य यांच्यावर सव्वा लाखांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. तर उत्तर प्रदेशमधील रामपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार मोहम्मद असिम राजा यांनी भाजपाचे उमेदवार आकाश सक्सेना यांच्यावर आघाडी घेतली आहे. तर खतौली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोक दल पक्षाचे उमेदवार मदन भैया यांनी भाजपाच्या राजकुमारी यांच्यावर आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात तिन्ही ठिकाणी पिछाडीवर पडल्याने हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तर राजस्थान, छत्तीसगड आणि ओदिशामधील विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्येही भाजपाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे तर ओदिशामध्ये बिजू जनता दल पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
बिहारमधील कुऱ्हानी मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपा आणि जनता दल युनायटेडच्या उमेदवारांमध्ये अटितटीची लढाई सुरू आहे. येथे जेडूयूचे उमेदवार मनोज कु्मार सिंह यांनी भाजपाच्या केदार प्रसाद गुप्ता यांच्यावर १९०० मतांनी आघाडी घेतली आहे.