नवी दिल्ली - महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या चार राज्यातील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघासाठी आणि पश्चिम बंगालमधील एका लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. चार विधानसभा आणि एक लोकसभा मतदारसंघात झालेल्या या निवडणुकीत सर्वच ठिकाणी भाजपाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाच्या खात्यात भोपळा पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव ह्या १३ हजारा मतांनी आघाडीवर आहेत. तर येथे भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम पिछाडीवर पडले आहेत. तर छत्तीसगडमधील काँग्रेसच्या उमेदवार यशोदा निलांबर वर्मा यांनी भाजपाच्या उमेदवार कोमल जांघेल यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे.
बिहारमधील बोचहां विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय जनता दलाने सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का दिला आहे. येथे राजदचे उमेदवार अमर कुमार पासवान यांनी भाजपा उमेदवारावर मोठी आघाडी घेतली आहे. भाजपाच्या बेबी कुमारी ह्या दुसऱ्या स्थानावर आहेत. तर पश्चिम बंगालमधील बालीगंज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार बाबूल सुप्रियो यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. येथे भाजपा उमेदवार चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.
तर देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत भाजपा दारुण पराभवाच्या छायेत आहे. येथे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी सव्वा लाखांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपाला गमवावा लागण्याची शक्यता आहे.