कोलकाता - भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून मोदींच्या धोरणांविरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर भाजपाला आपला इंगा दाखवला आहे. आसनसोल लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून लढणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा पराभव केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी तब्बल ३ लाखांहून अधिकच्या मताधिक्यासह विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला हा पराभव भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या बाबूल सुप्रियो यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिली होता. त्यामुळे आसनसोल लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. बाबूल सुप्रियो यांना तृणमूल काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. तर आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर भाजपाने शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात अग्निमित्रा पॉल यांना उमेदवारी जाहीर केली होती.
दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी घेतली. प्रत्येक फेरीअखेर त्यांची आघाडी वाढतच गेली. मतमोजणीच्या उत्तरार्धात शत्रुघ्न सिन्हा यांची आघाडी तीन लाखांच्या वर पोहोचली. शत्रुघ्न सिन्हा यांना आतापर्यंत ६ लाख ५२ हजार ५८६ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांना ३ लाख ५२ हजार ४३ मते मिळाली आहेत. त्यामुळे आता शत्रुघ्न सिन्हा यांच्या विजयाची केवळ औपचारिकताच बाकी आहे.
तर पश्चिम बंगालमधील बालीगंज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार बाबूल सुप्रियो यांनी विजय मिळवला आहे. बाबूल सुप्रियो यांना ५० हजार ९९६ मते मिळाली आहेत. तर या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर राहावे लागले आहे.