पोटनिवडणूक निकाल: घोसीमध्ये सपा, बागेश्वरमध्ये काँग्रेस; सुरुवातीचा कल भाजपला धक्का देणारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 10:07 AM2023-09-08T10:07:54+5:302023-09-08T10:12:59+5:30
Bypoll Election Results 2023: उत्तराखंडमधील बागेश्वर, उत्तर प्रदेशातील घोसी, केरळमधील पुथुपल्ली, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बॉक्सनगर आणि धनपूर या जागांवर पोटनिवडणूक झाली आहे.
विविध राज्यांतील सात विधानसभा मतदार संघात नुकतीच पोटनिवडणूक झाली होती. याची मतमोजणी आज सुरु झाली आहे. यामध्ये चर्चेत असलेले मतदारसंघ उत्तर प्रदेशचा घोसी आणि उत्तराखंडच्या बागेश्वर विधानसभेच्या जागेवर मतमोजणी सुरु झाली आहे. यापैकी घोसीमध्ये सपा आणि भाजपात कडवी टक्कर सुरु असून बागेश्वरमध्ये काँग्रेसनेभाजपाला धक्का देत आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
दोन्ही मतदारसंघात हे सुरुवातीचे कल असून दुपारी १२ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. मऊ मतदारसंघामध्ये भाजपाचे दारासिंह चौहान आणइ सपाचे सुधाकर सिंह यांच्याच कडवी टक्कर होत आहे. तर बागेश्वरमध्ये बॅलेट मतांच्या मोजणीत काँग्रेस उमेदवार बसंत कुमार 750 मतांनी पुढे आहेत.
उत्तराखंडमधील बागेश्वर, उत्तर प्रदेशातील घोसी, केरळमधील पुथुपल्ली, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बॉक्सनगर आणि धनपूर या जागांवर पोटनिवडणूक झाली आहे.
घोसी येथे पोस्टल मतांची मतमोजणी संपली आहे. पहिल्या फेरीतील मतमोजणी संपल्यानंतर भाजपचे उमेदवार दारा सिंह चौहान यांना ३२०३ तर सपा उमेदवार सुधाकर सिंह यांना ३३८१ मते मिळाली आहेत. घोसीमध्ये ५ सप्टेंबरला मतदान झाले होते. मात्र, ते खूपच कमी म्हणजे ५० टक्के एवढे झाले होते. या कमी मतदानाचा फायदा कोणाला होतो हे निकालात समजणार आहे.
त्रिपुरातील धनपूर मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील मतमोजणीनंतर भाजपच्या बिंदू देबनाथ 5341 मतांनी 4065 मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर माकपच्या कौशिक चंदा यांना १२७६ मते मिळाली आहेत. बॉक्सानगर जागेवर मतमोजणी सुरू असून भाजपचे तफज्जल हुसेन यांनी प्रतिस्पर्धी माकप उमेदवार मिजान हुसेन यांच्यावर ७३३१ मतांनी आघाडी घेतली आहे.
केरळमधील पुथुपल्ली मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचे वकील चंडी ओमान यांनी २८१६ मतांची आघाडी घेतली आहे. चंडी यांना 5699 मते मिळाली आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर सीपीआय(एम)चे जॅक सी थॉमस यांना 2883 मते मिळाली आहेत.
झारखंडच्या डुमरी विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत NDA-समर्थित AJSU पक्षाच्या उमेदवार यशोदा देवी त्यांच्या प्रतिस्पर्धी झारखंड मुक्ती मोर्चाच्या बेबी देवी यांच्यावर 1265 मतांनी आघाडीवर आहेत. बेबी देवी यांना २८५९ मते मिळाली आहेत.
पश्चिम बंगालमधील धुपगुरी विधानसभेच्या जागेवर रोमांचक लढत होणार आहे. येथून भाजप विरुद्ध टीएमसी आणि काँग्रेस-सीपीएम आघाडी अशी लढत झाली. येथून भाजपने दहशतवादी हल्ल्यातील शहीद जगन्नाथ राय यांच्या पत्नी तापसी यांना उमेदवारी दिली आहे, तर टीएमसीने प्राध्यापक निर्मल चंद्र रॉय यांना उमेदवारी दिली आहे.