- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ३ नोव्हेंबर रोजी पहिल्या ‘लिटमस टेस्ट’ला सामोरे जावे लागणार आहे. त्यात भाजप आणि जदयू-राजद-काँग्रेस यांच्या महाआघाडीच लक्षवेधी लढत होणार आहे. मोकामा आणि गोपालगंज विधानसभा जागांसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
राजदचे विद्यमान आमदार अनंत सिंग यांना दोषी ठरवून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर मोकामा जागा रिक्त झाली होती. राजदने आता अनंत सिंग यांची पत्नी नीलम देवी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने गँगस्टर नलिनी रंजन सिंहची पत्नी सोनम देवी यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा राजदकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
विद्यमान आमदार सुभाष सिंह यांचे निधन झाल्याने भाजपने गोपालगंज येथून त्यांची पत्नी कुसुम देवी यांना उमेदवारी दिली आहे. २००५ पासून गोपालगंजची जागा भाजप जिंकत आला आहे; पण एवढी वर्षे त्यांना जदयूचा पाठिंबा होता.
नितीशकुमार यांच्यासह लालूप्रसादही मैदानात?गोपालगंज हा राजद प्रमुख लालूप्रसाद यांचा मूळ जिल्हा आहे. मात्र, लालूंचे मेहुणे साधू यादव यांच्या पत्नी इंदिरा यादव यांची उमेदवारी राजदला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे ही तिरंगी लढत जिंकण्याची भाजपला आशा आहे. ही जागा जिंकण्यासाठी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव गोपालगंजमध्ये प्रचार करू शकतात.