नवी दिल्ली - भारतातील लोक आता १९९० च्या तुलनेत ८.९ वर्षे अधिक जगत असल्याचे लॅन्सेट या नियकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासानुसार, साथीच्या रोगाचा धक्का बसला असतानाही, गेल्या तीन दशकांमध्ये भारतासह संपूर्ण जगामध्ये लोकांचे आयुष्य वाढले आहे. जगभरातील लोक १९९० च्या तुलनेत २०२१ मध्ये सरासरी ६.२ वर्षे जास्त जगत आहेत.
आयुष्य का वाढले? गंभीर आजारांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याने आयुष्य वाढले आहे. मात्र, असे असले तरीही गंभीर आजार आजही १९९० प्रमाणेच आहेत. अतिसार, श्वसन संक्रमण, स्ट्रोक आणि इस्केमिक हृदयरोग यांसारख्या आजारांमुळे होणारे मृत्यू कमी झाले आहेत. २०२० मध्ये जर कोरोना महामारी आली नसती तर लोकांचे आयुष्य आणखी वाढले असते, असे अभ्यासात म्हटले आहे.
कोरोनाचा फटकाकोरोना महामारीमुळे २०१९ ते २०२१ दरम्यान जगभरातील नागरिकांचे आयुष्य १.६ वर्षांनी कमी झाले आहे. दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व आशिया आणि ओशिनियामध्ये नागरिकांच्या आयुर्मानात ८.३ वर्षांची वाढ नोंदवली. या क्षेत्राचे कोरोनामुळे होणारे आयुर्मान नुकसान कमी आहे. कोरोनाचा फटका लॅटिन अमेरिका, कॅरिबियनमध्ये बसला.