लोकसंख्येनुसार चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की, येत्या काळात भारतात लोकसंख्येचा स्फोट होईल आणि भारत चीनच्या पुढे जाईल. परंतु, भारताची लोकसंख्या येत्या 78 वर्षात 41 कोटींनी कमी होणार आहे. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे सध्या 142 कोटींच्या आसपास असलेल्या चीनची लोकसंख्या 2100 साली 49 कोटींपर्यंत घसरणार आहे. तुम्ही विचार करत असाल की, हे कसे होऊ शकते?
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन डिव्हिजनच्या डेटानुसार सध्या भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. परंतु आगामी काळात चीनची लोकसंख्या भारताच्या तुलनेत कितीतरी पटीने कमी होणार आहे. आकडेवारीनुसार, सन 2100 पर्यंत भारताची लोकसंख्या सुमारे 100 कोटी आणि चीनची लोकसंख्या 49 कोटींच्या आसपास येईल. अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर येत्या 78 वर्षांत अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटींवरून 28 कोटींवर येईल.
चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे, परंतु घनतेच्या बाबतीत भारत चीनपेक्षा खूप पुढे आहे. भारतात 1 चौरस किलोमीटरमध्ये 476 लोक राहतात. तर, चीनमध्ये 1 चौरस किलोमीटरमध्ये केवळ 148 लोक राहतात. कारण चीनचे क्षेत्रफळ भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. परंतु भारत, चीन आणि जपानची लोकसंख्येची घनता संपूर्ण जगाच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.