तेलंगणातील ११९ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून काँग्रेसने येथे मोठी आघाडी घेतल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणातून तेलंगणात केसीआर यांची सत्ता संपुष्टात येत असल्याचे दिसून आले. आज सकाळी निवडणूक निकाल हाती येत असताना काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर, बीआरएस दुसऱ्या क्रमांकावर असून गत निवडणुकीत केवळ १ जागा जिंकलेल्या भाजपलाही ६ ते ७ जागांवर आघाडी दिसून येत आहे.
काँग्रसने ६० जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून आल्यानंतर काँग्रेस समर्थकांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणाच्या हैदराबादमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर समर्थकांनी जमण्यास सुरुवात केली असून जल्लोष साजरा होत असल्याचे दिसून येते. इलेक्शन कमिशनच्या अधिकृत आकडेवारीनुसार तेलंगणात ४७ जागांवर काँग्रेस आघाडीवर असून बीआरएस २३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे, काँग्रेस समर्थक उत्साही झाले आहेत.
काँग्रेस कार्यालयाबाहेर एकमेकांना लाडू वाटून आनंदोत्सव साजरा होत आहे. विशेष म्हणजे, बाय बाय केसीआर.. अशी घोषणाबाजीही यावेळी काँग्रेस समर्थकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आम्हीच सरकार स्थापन करू. तेलंगणात आम्हीच सत्तेवर येऊ, जिंकू, असा विश्वास बीआरएसच्या आमदार आणि के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी व्यक्त केला आहे. मात्र, सध्यातरी काँग्रेसने आघाडी घेतल्याचं चित्र तेलंगणात आहे. हैदराबाद येथील ९ विधानसभा मतदारसंघात एमआयएमनेही उमेदवार उभे केले आहेत. तर, पवनकल्याण यांच्या जनसेवा पक्षाने ८ जागांवर निवडणूक लढवली असून ते भाजपासोबत युतीमध्ये आहेत.