लखनऊ: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार येथील पोटनिवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर होत आहेत. या दोन जागांवरील लढत ही भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे यापैकी एकाही जागेवर पराभव झाल्यास भाजपासाठी हा मोठा धक्का असू शकतो. तसेच या विजयामुळे भाजपाविरोधात एकटवण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांचे मनोबलही वाढू शकते. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात रविवारी पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले होते. याशिवाय, बिहारमधील अरारिया या लोकसभा मतदारसंघातील तसेच बभुआ आणि जेहनाबाद या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक पार पडली होती.नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार समाजवादी पक्षाने गोरखूपर मतदारसंघात निसटती आघाडी घेतली आहे. तर फुलपूर मतदारसंघातही सपाने तब्बल 12000 मतांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकांसाठी एकत्र येण्याचा सपा आणि बसपाचा निर्णय योग्य असल्याचे दिसून येत आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर तर केशवप्रसाद मौर्य हे फूलपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. या दोन्ही जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. फुलपूरमध्ये ३८ टक्के तर गोरखपूरमध्ये ४७ टक्के मतदान झाले होते. गोरखपूरमधून भाजपाकडून उपेंद्र दत्त शुक्ला, काँग्रेसकडून सुरीता करिम, समाजवादीकडून प्रवीण निशाद रिंगणात होते. तर फुलपूरमधून भाजपाकडून कौशलेंद्र सिंह पटेल, समाजवादी पक्षाकडून नागेंद्र प्रतापसिंह पटेल तर काँग्रेसकडून मनीष मिश्रा रिंगणात आहेत.
UP Bye Election Results 2018: योगींचा बालेकिल्ला ढासळला; गोरखपूर मतदारसंघात सपाची 15000 मतांनी आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 12:18 PM