लखनौ - उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधील अरारिया लोकसभा मतदारसंघात रविवारी पोटनिवडणूक झाली. गोरखपूरमध्ये ४३ टक्के तर, फुलपूरमध्ये ३७.३९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली.सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. ५ पर्यंत चाललेल्या या मतदानात नागरिकांचा उत्साह दिसून आला नाही. काही ठिकाणी ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या. या ठिकाणी तत्काळ मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या. केंद्रीय निमलष्करी दलाच्या ६५ कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानंतर या दोन लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. दरम्यान, गोरखपूरमध्ये मतदान केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, भाजपाला व्यापक समर्थन मिळत आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लोकांना हे माहीत झाले आहे की, विकास हे एकमेव रामबाण औषध आहे. बसपा आणि सपावर टीका करताना ते म्हणाले की, ते नकारात्मक आणि संधीसाधू राजकारण करत आहेत.सपा आणि बसपामधील बदलत्या राजकारणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, निवडणूक निकालांवर याचा काही परिणाम होणार नाही. जरी सपा, बसपा आणि काँगे्रस एकत्र लढले, तरी आमच्यासाठी चांगले निकाल येतील.फुलपूरमधून भाजपाचे कौशलेंद्र सिंह पटेल आणि गोरखपूरमधून उपेंद्रदत्त शुक्ला हे उमेदवार आहेत.अरारियात ५७ टक्के मतदानबिहारच्या अरारिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत रविवारी ५७ टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी जेडीयू-भाजपा आघाडीसाठी ही परीक्षा मानली जात आहे. नितीशकुमार यांनी राजदची साथ सोडून भाजपासोबत हातमिळवणी केल्यानंतर, होणारी ही पहिली निवडणूक आहे. राजदचे खासदार मोहम्मद तस्लीमुद्दीन यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ही लढाई तस्लीमुद्दीन यांचे पुत्र राजदचे सर्फराज आलम आणि भाजपाचे प्रदीप सिंह यांच्यात आहे.
पोटनिवडणूक - गोरखपूरमध्ये ४३%, फुलपूरमध्ये ३७% मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 2:09 AM