Bypoll Results 2021: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार संघात आणि अर्की, फतेहपूर, जुब्बल-कोटखाई येथील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला सपाटून मार खावा लागला आहे. भाजपाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे. पराभवाचं खापर यांनी थेट केंद्र सरकारवरच फोडलं आहे. वाढत्या महागाईमुळे हिमाचल प्रदेशात आज भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अशा निकालांची अजिबात अपेक्षा नव्हती, असं मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी म्हटलं आहे.
जयराम ठाकूर यांच्या विधानानंतर भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली असून सुत्रं हलू लागली आहेत. दुसरीकडे विरोधकांनी भाजपाविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला यांनीही जयराम यांचाच धागा पकडून केंद्रावर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारनं देशाच्या अर्थव्यवस्थेला कंगाल करत जनतेच्या खिशावरच डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे दाखवण्यासाठी आता कोणतीच आकडेवारी राहिलेली नाही. जीडीपीच्या खोट्या बाता मारल्या जात आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती सिलिंडरचे दर ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत. अशातच भाजपाविरोधी वातावरण आता तयार झालं आहे आणि असाच परिणाम उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही दिसून येईल, असं राजीव शुक्ला म्हणाले.
हिमाचल प्रदेशच्या एक लोकसभा आणि ३ विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसनं घवघवीत यश प्राप्त केलं आहे. तर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात होतं.
जयराम ठाकूर यांच्यासाठी धोक्याची घंटापोटनिवडणुकीत भाजपाच्या पराभवाचा फटका आता थेट मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री स्वत: मंडी जिल्ह्याचे आहेत आणि संपूर्ण पोटनिवडणूक त्यांच्याच नेतृत्त्वात भाजपा लढत होता. भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे जयराम ठाकूर यांच्या राजकीय भवितव्याबाबत आता शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. भाजपानं सध्या ज्यापद्धतीनं तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत आणि हिमाचलमधील पराभव लक्षात घेता जयराम ठाकूर यांच्यासाठी देखील धोक्याची घंटा मानली जात आहे.