ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - केंद्र सरकारच्या नॅशनल सुपरकम्प्युटींग मिशन (एनएसएम) अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) संस्थेने पहिला देशी बनावटीचा सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे. पुढील वर्षभरात हे काम पुर्ण होण्याची अपेक्षा असून त्यापुर्वी दोन कमी क्षमतेचे सुपर कॉम्प्युटर सी-डॅकच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
‘सी-डॅक’चे महासंचालक प्रा. रजत मूना व कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही दिली. प्रा.मूना म्हणाले, सी-डॅकने काम हाती घेतलेला सुपरकॉम्प्युटर देशातील पहिला देशी बनावटीचा असणार आहे. या सुपरकॉम्प्युटरचा आराखडा, विविध भागांची निर्मिती आणि जुळणी ‘सी-डॅक’ करणार आहे. सध्याच्या परम सुपर कॉम्प्युटरपेक्षाही या सुपर कॉम्प्युटरचा वेग अधिक असेल. जगभरात अशाप्रकारचे खुप कमी सुपरकॉम्प्युटर आहेत. हा संपुर्ण भारतीय बनावटीचा असल्याने या क्षेत्रात भारताची वेगळी ओळख निर्माण होईल, असा विश्वास प्रा. मुना यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ‘सी-डॅक’ची नवी इमारत म्हणजेच इनोव्हेशन पार्क ही पाच मजल्याची इमारत सज्ज झाली आहे. पाषाण येथील या इमारतीचे शनिवारी केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. सी-डॅककडून निर्मिती होणारा ‘डाटा’ मोठ्या प्रमाणात असून आता इनोव्हेशन पार्कमुळे त्यात आणखी वाढ होईल. केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाच्या विभागाची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ‘सी-डॅक’ने सायबर सिक्युरिटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ही सायबर सिक्युरिटी वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत मिळून एक सायबर सिक्युरिटी सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे, असे प्रा. मुना यांनी सांगितले.
ई-स्वाक्षरी प्रणाली विकसित
‘डिजिटल इंडिया’ या मोहिमेअंतर्गत सी-डॅकने ‘ई-स्वाक्षरी’ प्रणाली विकसित केली आहे. याअंतर्गत नागरिकांना डिजिटल कागदपत्रांवर आपली प्रमाणित स्वाक्षरी करणे शक्य होणार आहे. नागरिकांना त्यांच्या कागदपत्रांना कायद्याने स्वीकार्य स्वरूपात, सुरक्षितपणे आणि तात्काळ स्वाक्षरी करण्याची आॅनलाईन सुविधा पुरविणे हे ‘ई-स्वाक्षरी’ प्रणालीचे उद्दीष्ट आहे.
पालिकेला ‘स्मार्ट सिटी’साठी मदत
पुणे महापालिकेला स्मार्ट सिटीअंतर्गत वाहतुक व पाणी या दोन महत्वाच्या गोष्टींच्या व्यवस्थापनात मदत करण्यासाठी सी-डॅक सहकार्य करणार आहे. त्याबाबतचा करारही काही दिवसांपुर्वीच झाला आहे. त्यानुसार सी-डॅकने संशोधन करुन प्रणाली विकसित करण्याचे काम सुरु आहे. या प्रणालीनुसार येत्या काही दिवसात या दोन्ही गोष्टींवर काही प्राथमिक स्तरावर चाचण्या घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. दरबारी यांनी दिली.