देशात NDA पुन्हा सत्तेत तर INDIA आघाडीच्या पदरी निराशा?; सर्व्हेतून आकडेवारी समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 09:00 AM2023-12-26T09:00:37+5:302023-12-26T09:01:33+5:30

मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला ४२ टक्के, इंडिया आघाडीला ३८ टक्के आणि इतरांना २० टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

C voter Opinion Poll: BJP Alliance NDA again in Power, but INDIA Alliance in lost hopes | देशात NDA पुन्हा सत्तेत तर INDIA आघाडीच्या पदरी निराशा?; सर्व्हेतून आकडेवारी समोर

देशात NDA पुन्हा सत्तेत तर INDIA आघाडीच्या पदरी निराशा?; सर्व्हेतून आकडेवारी समोर

नवी दिल्ली - Survey On Loksabha Election ( Marathi News ) पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. या निवडणुकीत भाजपाप्रणित NDA आणि काँग्रेससह INDIA आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळेल. दोन्हीही आघाड्या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा दावा करत आहेत. त्यात लोक कुणाला साथ देतील हा खरा प्रश्न आहे. कुणाला किती जागा मिळणार? त्यावरून एक सर्व्हेसमोर आला आहे. त्यात एनडीएला ४० टक्के तर इंडिया आघाडीला ३५ टक्क्याहून अधिक मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ओपिनियन पोलनुसार, विरोधकांच्या इंडिया आघाडीला निवडणुकीत फटका बसू शकतो. भाजपा नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा तिसऱ्यांदा बहुमतात सरकार बनवू शकते. सर्व्हेत एनडीएच्या पारड्यात २९५ ते ३३५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला लोकसभेच्या ५४३ जागांपैकी १६५ ते २०५ जागांवर विजय मिळू शकतो. त्याशिवाय ३५ ते ६५ जागा इतरांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला ४२ टक्के, इंडिया आघाडीला ३८ टक्के आणि इतरांना २० टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया आघाडीत कोणते पक्ष सहभागी?
विरोधकांनी बनवलेल्या इंडिया आघाडीत प्रामुख्याने काँग्रेस, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा टीएमसी, बिहारच्या नितीश कुमारांचा जेडीयू. डिएमके, आम आदमी पार्टी, आरजेडी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांसह एकूण २८ पक्ष समाविष्ट आहेत. 

तर एनडीएमध्ये भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, जेडीएस यासह अन्य पक्ष आहेत. याशिवाय एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाडीत सहभागी नसलेले असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम, केसीआर यांची भारत राष्ट्र समिती पार्टी, टीडीपी, बीजेडीसह अन्य पक्ष आहेत. जर पुढील होणाऱ्या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले तर देशात भाजपाची विजयाची हॅट्रीक होईल. मात्र लोक आपल्याला साथ देतील असा विश्वास इंडिया आघाडीच्या नेत्यांना आहे. 

महाराष्ट्रात कोणाचे पारडे जड?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. इथं काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येते. जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार, इथं महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असं बोलले जात आहे. 

Web Title: C voter Opinion Poll: BJP Alliance NDA again in Power, but INDIA Alliance in lost hopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.