अहमदाबाद : छानशौकी, ऐशो आरामाचे आयुष्य, महिन्याला तब्बल सव्वा लाख रुपये पगार, नरिमन पॉइंटसारख्या ठिकाणी असलेल्या एका बड्या कंपनीतील उत्तम नोकरी, सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत ऑल इंडिया रँकिंगमध्ये टॉप करणाऱ्या एका तरुणीने या सर्व गोष्टींचा त्याग करून थेट साध्वी होण्याचा निर्णय घेतला आहे.
आरामदायी जीवन सोडून साध्वी होण्याचा निर्णय घेतलेल्या या तरुणीचे नाव पायल शाह आहे. पायल ३१ वर्षांची आहे. सन २०१४ मध्ये नरिमन पॉइंट येथील एका बड्या कंपनीत ती नोकरीला लागली. या कंपनीत तिला तब्बल सव्वा लाख रुपये महिना म्हणजेच वर्षाला १५ लाख रुपये पगार मिळत होता. सनदी लेखापालाच्या कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत ऑल इंडिया रँकिंगमध्ये पायल टॉप ठरली होती. मात्र, अचानक तिने एक वेगळा मार्ग निवडला.
पायल शाह मूळची गुजरातची आहे. तिच्या वडिलांचे मुंबईत भांड्यांचे दुकान आहे. आयुष्यातील धन-ऐश्वर्य, सर्व मोहमायेचा त्याग करून जैन साध्वी म्हणून पायलला दीक्षा दिली जाणार आहे. २४ फेब्रुवारीला सूरतमध्ये होणाऱ्या एका समारंभात पायलला दीक्षा दिली जाणार आहे. यानंतर ती आपले संपूर्ण आयुष्य साध्वी होऊन जगणार आहे. पायलच्या प्रेरणास्रोत आणि गुरू पूज्य साध्वीजी प्राशमलोचनाश्रीजी या ही दीक्षा देणार आहेत.
नवीन प्रवासासाठी दररोज पाच किलोमीटर चालण्यास सुरुवात केली. माझा प्रवास सात वर्षांपूर्वी सुरू झाला. माझ्या घराजवळ राहणाऱ्या साध्वींच्या घरी मी जात होते. एकही सुट्टी न घेता, मोबाईल फोन न वापरता, या साध्वी किती आनंदात आहेत. हे पाहून मी आश्चर्यचकीत झाले, असे पायलने या निर्णयाच्या पार्श्वभूमीबाबत बोलताना सांगितले.