नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात हिंसाचार सुरू आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांना हिंसक वळण लागलेलं आहे. आंदोलनाने गुरुवारी रौद्ररूप धारण केल्याने दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले होते. हे आंदोलन पसरू नये, म्हणून सरकारने दिल्लीतील मोबाइल व इंटरनेट सेवा बंद केल्या. त्याच दरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड केली.अशा तणावाच्या वातावरणात सायंकाळी उशिरा जंतर-मंतरवर आंदोलन करणार्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले होते. पण तिकडे पोलीस गेले असता वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पोलिसांना पाहताच आंदोलकांनी 'जन गण मन' हे राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. राष्ट्रगीत ऐकताच कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलकांना हातही लावला नाही. सर्व पोलिसांनी सावधगिरी बाळगून आंदोलकांसोबत राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतीय संस्कृतीचं पुन्हा एकदा पोलिसांनी दर्शन घडवलं आहे. जमावबंदीचा आदेश झुगारून अनेक विद्यार्थी जंतरमंतरवर जमा झाले होते. विद्यार्थ्यांनी तोंडाला पट्ट्या लावून ‘सेव्ह कान्स्टिट्युशन’ असा मजकूर लिहिलेले फलक हाती घेतले होते. हजारो विद्यार्थी सकाळपासून लाल किल्ला परिसरात जमा झाले होते. परंतु पोलिसांनी तिथे लगेचच जमावबंदी लागू केली आणि विद्यार्थी नेता उमर खालिद याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी सर्वच विद्यार्थ्यांना पकडण्याचे सत्र सुरू केले. तेथून सुमारे 20 गाड्या भरून विद्यार्थ्यांना नेण्यात आले. गेल्या रविवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. जामिया, जेएनयू व दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांनी लाल किला परिसरात शांततेने आंदोलनाचे आवाहन केले होते.
CAA Protests: धरपकड करण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोर आंदोलकांनी राष्ट्रगीत म्हटले; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 9:03 AM