नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणही लागलं. या हिंसक आंदोलनांमुळे कर्नाटकातल्या मंगळुरूत दोन, लखनऊमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला. गुजरातमधलाही असाच एक व्हिडीओ समोर आला. ज्यात आंदोलकांनी पोलिसांना घेरल्याचं पाहायला मिळतंय. जमावानं पोलिसांना घेरून त्यांच्यावर दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांनीही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले.अहमदाबादमधल्या शाह-ए-आलम भागातही जमावानं पोलिसांना घेरल्यानंतर त्यांना मारहाणही केली. ज्यात डीसीपी, एसीपी निरीक्षकांसह 19 पोलीस कर्मचारी जखमी झाले. एका पोलीस कर्मचाऱ्याला जमावानं जबरदस्त मारहाण केली. त्याच दरम्यान काही तरुणांनी भारताचा तिरंगा उंचावत त्या पोलिसांचा जीव वाचवला. जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात येत होती. त्यावेळी तरुणांनी एक सुरक्षा कवच तयार केलं आणि पोलिसांना त्या जमावाच्या तावडीतून सोडवलं. विशेष म्हणजे ते तरुणसुद्धा नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रदर्शन करत होते. हिंसक झालेल्या जमावाचा व्हिडीओ गुजरातमधील अहमदाबादमधून समोर आला आहे.
CAA Protests: शेकडो आंदोलकांनी पोलिसांना घेरलं; तिरंगा फडकावून काही तरुणांनी वाचवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 9:46 AM