नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत रविवारी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सीएएच्या निषेधार्थ जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या होत्या. मात्र कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात मौजपूर चौकाजवळ लोक जमा झाले. त्याचवेळी मौजपूरमधील कबीर नगर मेट्रो स्थानकाजवळ सीएएच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये दगडफेक झाली आहे. दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला.
सीएएच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी कबीरनगर मेट्रो स्थानकाजवळ एकमेकांवर दगडफेक सुरू केली, त्यामुळे येथील रस्त्यावर लोकांमध्ये धावपळ झाली. या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. दोन्ही बाजूंनी होणारी दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे हवेत उडवले. मौजपूरमध्ये भाजप नेते कपिल मिश्रा यांचे समर्थक आहेत, तेथून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर जाफराबादमध्ये सीएए विरोधी आंदोलन सुरु आहे.
दोन मेट्रो स्थानके बंदसीएएचे समर्थक आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे दिल्ली मेट्रोने (डीएमआरसी) मौजपूर आणि बाबरपूर मेट्रो स्थानके बंद केली आहेत.
यावेळी भाजपा नेते कपिल मिश्रा म्हणाले की, जाफराबाद आंदोलनाच्या निषेधार्थ आणि सीएएच्या समर्थनार्थ ते रस्त्यावर उतरलेत. आम्ही दिल्लीत आणखी एक शाहीन बाग उभारू देणार नाही असं त्यांनी सांगितले. कपिल मिश्रा यांनी व्हिडिओ ट्विट करुन म्हटलंय की,"दुसरी शाहिन बाग दिल्लीत होऊ देणार नाही. तसेच लोकांना सीएएच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. मौजपूर चौकात दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शाहीन बागच्या विरोधात सरिता विहार येथे निदर्शनेरविवारी, दक्षिण पूर्व दिल्लीच्या सरिता विहार आणि जसोला परिसरातील लोक शाहीनबागच्या आंदोलनाविरुद्ध निदर्शने करत होते. महिला आणि निष्पाप मुलांची ढाल बनवून इतर महिला आणि मुलांना त्रास देण्याचे कारस्थान थांबवा अशी मागणी रहिवाशांनी केली. दुसरीकडे, सीएएच्या विरोधातील आंदोलनामुळे जाफराबाद मेट्रो स्टेशनवर एक बाजूचा रस्ता बंद करण्यात आला, शनिवारी उशिरा सुमारे 200 ते 300 महिलांनी मेट्रो अंतर्गत निदर्शने करण्यास सुरवात केली, त्यानंतर मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दले तेथे तैनात करण्यात आली होती. महिला आंदोलकांना पाहता महिला जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. सध्या ज्या रस्त्यावर आंदोलक बसले आहेत, तो रस्ता एका बाजूला खुला आहे, त्यामुळे जाम देखील तयार होत आहे.
जाफराबादमधील आंदोलनावर भाजप नेते विजय गोयल म्हणाले की, "हे नियोजित पद्धतीने घडत आहे, मोदींना पराभूत करू न शकलेले यामागे आहेत." संसदेत कायदा मंजूर झाल्यानंतर अशाप्रकारे आंदोलन करणे चुकीचे आहे 'पोलिसांना हवे असल्यास त्यांनी कोणतीही कारवाई केली असती, परंतु मुले व स्त्रिया आहेत, यामुळे कारवाई करता येत नाही.