नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आसामापासून राजधानी दिल्लीपर्यंत अनेक भागात हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी केली आहे. हिंसक आंदोलनाला रोखलं कसं जाईल यावर खबरदारी आणि राज्यातील प्रत्येक नागरिकांची सुरक्षा अबाधित राहील याची दक्षता घेण्याचे आदेश दिलेत.
अमित शहांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश दिले आहे. सोशल मीडियावर वरुन होणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांवर लक्ष ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात सोशल मीडियात अनेक खोटी माहिती पसरविण्यासाठी केंद्र सरकारने जबाबदार धरलं आहे.
मात्र यापूर्वी भाजपाने पत्रकार परिषद घेत जामियासह देशभरात हिंसक आंदोलन भडकण्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोध पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी राहुल गांधी, प्रकाश करात, डी. राजा असे लोक त्याठिकाणी गेले होते. पुन्हा एकदा अशाप्रकारचे प्रयत्न होताना दिसत आहे. शनिवारी राहुल गांधी यांची रॅली झाली. या रॅलीच्या माध्यमातून रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला अन् दुसऱ्याच दिवशी हिंसाचार वाढला. त्यामुळे या संपूर्ण हिंसक आंदोलनाच्या मागे काँग्रेसचा हात आहे असा आरोप भाजपाने केला आहे. त्याचसोबत राजकीय पक्षांनी आपापल्या ओवैसींना मुस्लीम मतांसाठी उतरविले आहे. ओवैसी देशाचे नवे जिन्ना आहे असा आरोपही भाजपाने केला. दरम्यान, जामिया विश्वविद्यापीठातील युवकांना टॉयलेटमध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली. मुलींनाही मारहाण करण्यात आली.
आमच्या काळातही विद्यार्थ्यांची आंदोलन होत होती. मात्र कॉलेज प्राध्यापकांच्या परवानगीशिवाय पोलीस विद्यापीठात प्रवेश करु शकत नव्हते. जर कुलगुरु आणि कॉलेज प्राचार्यांनी परवानगी दिली नाही तर दिल्ली पोलीस विद्यापीठात घुसले कसे? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
त्याचसोबत माझ्याकडे जे व्हिडीओ आलेत त्यामध्ये विद्यार्थींनी आम्हाला वाचवा-वाचवा असे ओरडत होते. त्याचा आम्ही निषेध करतो. देशातील अन्य भागातही विद्यार्थी निदर्शने करतात. केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कोलकाता, सूरत, वाराणसी, बिहार, औरंगाबाद, कानपूर, मुंबई याठिकाणीही प्रदर्शन होत आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे. पंतप्रधान मोदी सांगतात हे सर्व काँग्रेस पक्ष करतोय, जर काँग्रेसमध्ये इतकी ताकद असती तर तुम्ही सत्तेत नसता. या आंदोलनाला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केला.