CAA: हिंदू भारतात येणार नाहीत तर काय इटलीत जाणार का?; भाजपा नेत्याचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:06 AM2020-01-02T10:06:03+5:302020-01-02T10:08:11+5:30
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे.
नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. याच दरम्यान केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची बाजू मांडताना काँग्रेसला टोला लगावला आहे.
हिंदू भारतात येणार नाहीत तर कुठे जाणार?, इटली त्यांना घेणार आहे का? असं भाजपाच्या जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे. 'हिंदू जर भारतात येणार नाहीत, तर ते कुठे जाणार? इटली त्यांना थोडीच नागरिकत्व देणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून येणाऱ्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे आणि त्यांचं संरक्षण करणे ही भारताची जबाबदारी आहे' असं रेड्डी यांनी म्हटलं आहे.
Union Minister G Kishan Reddy in Varanasi on #CitizenshipAmendmentAct: If Hindus will not come to India, where will they go? Italy thodi lenge unko. It's India's responsibility to provide citizenship & protection to minorities from Pakistan, Bangladesh & Afghanistan (1.1.20) pic.twitter.com/JwYjs35IR2
— ANI UP (@ANINewsUP) January 1, 2020
दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उफाळलेल्या हिंसाचारावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाने या हिंसाचारासाठी काँग्रेस व आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारास काँग्रेस व आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला. बुधवारी (1 जानेवारी) नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून जावडेकरांनी आप आणि काँग्रेसवर टीका केली होती. 'दिल्लीसारख्या शांततामय शहरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल चुकीची माहिती पसरवून जे वातावरण निर्माण करण्यात आले व येथील संपत्तीचे नुकसान झाले आहे. काँग्रेस व आम आदमी पक्ष यासाठी जबाबदार आहे. त्यांनी जनतेची माफी मागायला हवी' असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं होतं.
हरयाणामधील कुरुक्षेत्र येथील भाजपा खासदार तसेच माजी मंत्री नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधींवर टीका करताना मंगळवारी एक वादग्रस्त विधान केलं. 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत' असं नायब सिंह सैनी यांनी म्हटलं होतं. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल राहुल गांधी यांना काहीही माहिती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं. नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख महामूर्ख असा केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व काढून घेण्यात येणार नाही ही गोष्ट राहुल गांधी यांना माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला होता. 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत. सीएए हे नेमकं काय आहे आणि कशासाठी आहे हेच त्यांना माहीत नाही' असं सैनी यांनी म्हटलं होतं.