CAA Notification: देशात लवकरच नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होणार आहे. मंगळवारी(दि.27) काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा कायदा देशभरात लागू होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी होण्यापूर्वी गृह मंत्रालयाला हा कायदा लागू करायचा आहे. या कायद्यानुसार, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे.
रिपोर्टनुसार, सीएएसाठीचे सर्व नियम तयार असून, ऑनलाइन पोर्टलदेखील तयार झाले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि अर्जदार त्यांच्या मोबाइल फोनवरुन नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील. अर्जदारांनी भारतात प्रवेश केल्याचे वर्ष नमूद करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, यासाठी अर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत.
CAA अंतर्गत केंद्रातील मोदी सरकार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळामुळे भारत आलेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन घेऊ शकतात.
चार वर्षांनंतर अंमलबजावणीडिसेंबर 2019 मध्ये CAA संसदत मंजूर झाला होता. या कायद्याला राष्ट्रपतींची संमतीदेखील मिळाली होती. पण, देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली, परिणामी अनेक मृत्यू झाले. 4 डिसेंबर 2019 रोजी संसदेत विधेयक मांडले गेले तेव्हा आसाममध्ये पहिल्यांदा निदर्शने सुरू झाली. यानंतर ही निदर्शने दिल्लीसह मोठ्या शहरांमध्ये पसरले. निदर्शनांमुळे 27 मृत्यू झाले, त्यापैकी 22 एकट्या उत्तर प्रदेशात घडले. एक हजाराहून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून आंदोलकांवर 300 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व विरोधामुळे हा कायदा लागू करण्यात उशीर झाला.