जयपूर : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नोंदणी नागरिक (एनआरसी) राजस्थानात लागू केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी राजधानी जयपूरमध्ये संविधान बचाव शांती मार्च काढल्यानंतर याठिकाणी आयोजित सभेत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत सीएए आणि एनआरसी राज्यस्थानमध्ये लागू करणार नाही, अशी घोषणा केली.
जनसभेत मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, "तुम्ही बहुमताने कायदा आणू शकता. मात्र, लोकांची मनं जिंकू शकत नाही. उत्तर प्रदेशात 15 जणांचा मृत्यू झाला. ज्या राज्यात भाजपाशासित सरकार आहेत, त्याठिकाणी गोळीबार झाला." याचबरोबर, आसामध्ये एनआरसी अयशस्वी झाली. त्याठिकाणी एनआरसीमधून 16 लाख हिंदू बाहेर झाले. आता सीएए आणले. हे अव्यवहारिक असे अशोक गहलोत यांनी सांगितले. याशिवाय, अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा हल्लाबोल केला. बिहारचे मुख्यमंत्री आणि ओडिशाचे मुख्यमंत्री जे की संसदेत तुम्हाला पाठिंबा देतात. ते सुद्धा त्यांच्या राज्यात एनआरसी लागू करणार नाहीत. त्यामुळे जनतेच्या भावना समजून राजस्थान सरकार हे दोन्ही कायदे राज्यात लागू करणार नाही, असे अशोक गहलोत म्हणाले.
दरम्यान, सीएएच्याविरोधात सध्या देशातले वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असून काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागले आहे. सीएएवरुन एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर टीका केली आहे. ही लढाई फक्त मुस्लिमांपुरती मर्यादित नसून यामध्ये दलित आणि अनुसुचित जाती- जमातींचादेखील समावेश असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सीएए या काळ्या कायद्याला विरोध आहे, त्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा. जेणेकरुन भाजपाला हा कायदा चुकीचा असल्याचा संदेश पोहोचण्यास मदत होईल. तसेच, या कायद्याला शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने विरोध करावा, असे आवाहन करत असदुद्दीन ओवेसी यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिकरित्या वाचन केले.
दुसरीकडे याच मुद्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषी ठरवत सरकारच्या आदेशानुसारच जाणीवपूर्वक जाळपोळ व हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केले आहे. अर्थव्यवस्था, रोजगार आणि शेतकर्यांच्या मुद्दय़ावर भाजपा पूर्णपणे अपयशी ठरले आहे, त्यामुळे जनतेचे लक्ष वळवण्यासाठी दंगली पसरवल्या जात आहेत. दंगलीचा फायदा भाजपला होतो. दंगल घडवून आणणारे लोकं सरकारमध्ये बसले आहेत. तसेच भाजप जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे सुद्धा अखिलेश यादव म्हणाले.