लखनऊ: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज आंदोलनांना हिंसक वळण लागलं. गेल्या २४ तासांमध्ये ५ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तर ८ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मेरठमध्ये आज आंदोलकांनी एका पोलीस चौकीला आग लावली. याशिवाय इतर काही ठिकाणीदेखील आंदोलनांना गालबोट लागलं. उत्तर प्रदेशात लागोपाठ दुसऱ्या दिवशी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली. अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनांला हिंसक वळण लागलं. बिजनोरमध्ये एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला. तर ८ पोलीस कर्मचारी जखमी झाले. राज्यात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनांदरम्यान आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच जणांचा मृत्यू आज झाला. बिजनोरमध्ये दोन आंदोलकांचा, तर लखनऊ, कानपूर, संभल आणि फिरोजाबादमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. बिजनोरच्या नटहौरमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत ८ कर्मचारी जखमी झाले. याशिवाय फिरोजाबाद, गोरखपूर, मेरठ, गाजियाबाद, हापूड, बहराईच, मुझफ्फरपूर, कानपूर, उन्नाव, भदोहीमध्येही उग्र आंदोलनं झाली. कानपूरमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कानपूरमध्ये पोलिसांनी लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
CAA Protest : उत्तर प्रदेशात 24 तासांत 5 आंदोलकांचा मृत्यू; अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 8:13 PM