नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत सोमवारी (24 फेब्रुवारी) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. सीएएच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केल्याने तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा यामध्ये मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत. आंदोलकांनी नेमौजपूर भागात दोन घरही पेटवली आहेत. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आहेत. रविवारी देखील सीएए विरोधी आंदोलनात दगडफेक झाली होती. सीएएच्या निषेधार्थ जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या होत्या. मात्र कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात मौजपूर चौकाजवळ लोक जमा झाले. त्याचवेळी मौजपूरमधील कबीर नगर मेट्रो स्थानकाजवळ सीएएच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता.
सीएएच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी कबीरनगर मेट्रो स्थानकाजवळ एकमेकांवर दगडफेक सुरू केली, त्यामुळे येथील रस्त्यावर लोकांमध्ये धावपळ झाली. या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. दोन्ही बाजूंनी होणारी दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे हवेत उडवले होते.
दोन मेट्रो स्थानके बंद
सीएएचे समर्थक आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे दिल्ली मेट्रोने (डीएमआरसी) मौजपूर आणि बाबरपूर मेट्रो स्थानके बंद केली आहेत. जाफराबाद आंदोलनाच्या निषेधार्थ आणि सीएएच्या समर्थनार्थ ते रस्त्यावर उतरलेत. आम्ही दिल्लीत आणखी एक शाहीन बाग उभारू देणार नाही असं भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी म्हटलं होतं. तसेच कपिल मिश्रा यांनी व्हिडिओ ट्विट करुन म्हटलंय की,"दुसरी शाहिन बाग दिल्लीत होऊ देणार नाही. तसेच लोकांना सीएएच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. मौजपूर चौकात दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींच्या विमानात 'हा' आहे फरक