पुरूलिया - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. आसाममध्ये राबविण्यात येणारी एनआरसी योजना तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
पुरूलिया येथे सोमवारी (30 डिसेंबर) एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच भाजपाला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. 'तुम्ही केवळ मतदान यादीत आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करा, आम्ही एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही, हे आमचं वचन आहे' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी याआधीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यामध्ये भाजपा हा बंगालीविरोधी पक्ष आहे, असं आवर्जून सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षणाखाली सार्वमत घ्यावं असे आव्हान त्यांनी दिलं होतं. ''केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यासारख्या कुठल्याही निष्पक्षपाती संघटनेच्या देखरेखीखाली सार्वमत घ्यावे आणि किती नागरिक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने आहेत आणि किती नागरिक विरोधात आहेत हे विचारावे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 73 वर्षांनी आम्हाला अचानकपणे आम्ही भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करावे लागणार आहे. तुम्ही तुमचा विरोध मवाळ करू नका कारण आपल्याला नागरिकत्वविरोधा कायदा रद्द करायचा आहे.''
कोलकातामधील धर्मतला येथे एका आंदोलनात सहभागी झालेल्या ममता बॅनर्जी यांनी मंचावर आंदोलकांसोबत आंदोलनात सहभागी होत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला विरोध केला होता. ''सध्या भाजपा खास प्रकारच्या टोप्या खरेदी करत आहे. या टोप्या परिधान करून ते हिंसाचार माजवण्यास सांगणार आहे जेणेकरून एक समुदाय बदनाम व्हावा हा त्यांचा हेतू आहे. त्यांना यशस्वी होऊ देऊ नका'' असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.