CAA: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 'तो' व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल, काँग्रेसची गोची
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:23 PM2019-12-19T17:23:55+5:302019-12-19T17:24:23+5:30
बांग्लादेशात धार्मिकतेमुळे हिंसा झालेल्या शरणार्थींबाबत सरकारला सहानभूतीपूर्वक विचार करावा लागेल
नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशातील विविध भागात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. डाव्या पक्षांनी भारत बंदचं आवाहन केलं त्याला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. या दरम्यान भाजपाकडूनकाँग्रेसला घेरण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडीओ समोर आणला आहे. २००३ मध्ये राज्यसभेत मनमोहन सिंग बोलतानाचा हा व्हिडीओ आहे.
या व्हिडीओमध्ये डॉ. मनमोहन सिंग म्हणतात की, बांग्लादेशात धार्मिकतेमुळे हिंसा झालेल्या शरणार्थींबाबत सरकारला सहानभूतीपूर्वक विचार करावा लागेल. २००३ मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार होतं. त्यावेळी मनमोहन सिंग राज्यसभेचे सदस्य होते. यावेळी सभागृहात उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टीका करताना मनमोहन सिंग यांनी हे वक्तव्य केलं होतं.
In 2003, speaking in Rajya Sabha, Dr Manmohan Singh, then Leader of Opposition, asked for a liberal approach to granting citizenship to minorities, who are facing persecution, in neighbouring countries such as Bangladesh and Pakistan. Citizenship Amendment Act does just that... pic.twitter.com/7BOJJMdkKa
— BJP (@BJP4India) December 19, 2019
इतर देशातून आलेले शरणार्थी यांचे दु:ख केंद्र सरकारने समजून घ्यावे, विभाजनानंतर बांग्लादेशात धार्मिक हिंसाचार उफाळून आला. त्यात अनेकांवर अत्याचार झाले. जर हे लोक शरणार्थी म्हणून भारतात येत असतील तर त्यांना सांभाळणे आपलं दायित्व आहे. या लोकांना शरण देणे व्यवहार्य राहील. त्यामुळे सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयकाकडे लक्ष द्यावं अशी मागणी डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केली होती.
सध्या काँग्रेस धार्मिक मुद्द्यावरुन नागरिकत्व देण्याचा विरोध करत केंद्र सरकारवर टीका करत आहे. अशावेळी भाजपाकडून काँग्रेसचे पूर्वीचे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. मनमोहन सिंग यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
डाव्यांच्या या बंदला विरोधकांनी समर्थन दिलं आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. तर दिल्लीतील 14 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत. लाल किला, जामा मशीद, चांदणी चौक आणि विश्वविद्यालयातील प्रवेशद्वार बंद करण्यात आला आहे, असं डीएमआरसीनं ट्विट करत सांगितलं आहे. तसेच जामिया मिलिया इस्लामिया, जसोला विहार, शाहीन बाग आणि मुनिरका स्टेशनांवरही ट्रेन थांबवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नागरिकत्व कायद्यासंदर्भात पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी हिंसक प्रदर्शन झालेलं नाही. तसेच डावे रामलीलापासून लेडी ब्रेबॉर्न कॉलेजपर्यंत मार्च काढणार आहे. तसेच बुद्धिजिवी वर्ग रामलीला मैदान ते हॉग मार्केटपर्यंत मार्च काढणार आहेत.