नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचार चांगलाच भडकला असून केंद्र सरकार यावर गांभीर्याने लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारावर आपले मत मांडले आहे. दिल्लीतील प्रभावित भागात सैन्याला पाचारण करून संचारबंदी लागू करावी, अशी मागणी केजरीवाल यांनी ट्विट करून केली आहे.
केजरीवाल म्हणाले की, मी रात्रभर अनेक लोकांशी संपर्क साधला. दिल्लीतील स्थिती चिंताजनक आहे. प्रयत्न करूनही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. अशा स्थितीत सैन्याला पाचारण करायला हवं आणि प्रभावित भागात संचारबंदी लागू करावी. त्यासाठी आपण गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे केजरीवाल यांनी नमूद केले.
दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले की, मी आश्वासन देतो, कायद्याच पालन करणाऱ्या कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही. पूरेशी यंत्रणा तैनात आहे. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही, असंही डोवाल यांनी म्हटले आहे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील हिंसेवर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी डोवाल यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.