नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजने'ला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज मिळणार असून वर्षाला 15,000 हजार रुपयांची बचत होणार आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, 13 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी या पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा केली होती.
यामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी दोन किलोवॅटपर्यंतच्या रुफ टॉप सोलर प्लांटची किंमत 145,000 रुपये असणार आहे. यामध्ये सरकार 78000 रुपये सबसिडी देणार आहे. यासंदर्भात एक राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले असून घरमालक त्यावर विक्रेता निवडू शकतील. यासाठी बँकेकडून सुलभ हप्त्यांमध्ये कर्जही उपलब्ध होणार आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत प्रत्येक गावात मॉडेल सोलर व्हिलेज बनवले जाणार आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, मंत्रिमंडळाने पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला 75,021 कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह एक कोटी घरांमध्ये छतावरील सौर ऊर्जा संयंत्रे बसविण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेत केंद्र सरकार आर्थिक मदत करते. यानुसार एक किलोवॅट प्रणालीसाठी 30,000 रुपये अनुदान, दोन किलोवॅट प्रणालीसाठी 60,000 रुपये आणि तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या प्रणालींसाठी 78,000 रुपयांचे अनुदान असणार आहे.
मॉडेल सोलर व्हिलेज याचबरोबर, ग्रामीण भागात रूफटॉप सोलरचा अवलंब करण्यासाठी रोल मॉडल म्हणून काम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल सोलर गावे विकसित केली जातील. या अंतर्गत डिस्कॉमला अतिरिक्त वीज विकून कुटुंबे अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. रुफटॉप सोलरद्वारे निवासी क्षेत्रात 30 गिगावॅट सौरऊर्जेची क्षमता वाढणार आहे. या सौर सिस्टम प्रणाली 25 वर्षांत 720 दशलक्ष टन CO2 समतुल्य उत्सर्जन कमी करतील. या योजनेमुळे उत्पादन, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री, स्थापना, ओ अँड एम आणि इतर सेवांमध्ये सुमारे 17 लाख थेट नोकऱ्या निर्माण होतील.
शेतीशी निगडीत अनेक निर्णयअनुराग ठाकूर म्हणाले की, मंत्रिमंडळाने शेती आणि शेतीशी निगडीत अनेक निर्णय घेतले आहेत. जगात युरिया खताच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, या वाढलेल्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांवर काहीही होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यानुसार, मंत्रिमंडळाने खरीप हंगाम-2024 साठी (01.04.2024 ते 30.09.2024 पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांवर पोषक तत्वांवर आधारित अनुदान दर आणि NBS योजनेंतर्गत 3 नवीन खत ग्रेड समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे.
सेमीकंडक्टर फॅबला मंजुरीकेंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅबला मंजुरी दिली आहे. त्याअंतर्गत 40 प्लांट उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये एकूण 1 लाख 26 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. पहिला फॅब टाटा आणि पॉवर चिप तैवानच्या सहकार्याने तयार केला जाईल. याअंतर्गत दर महिन्याला 50 हजार वेफर्स बनवण्यात येणार असून एका वेफरमध्ये 5000 चिप्स असतात. या प्लांटमधून 300 कोटींच्या चिप्स बनवल्या जाणार आहेत. ही चिप 8 सेक्टरमध्ये उपयुक्त ठरणार आहे. जसे की उच्च शक्ती, दूरसंचार, संरक्षण, ऑटोमोबाईल. हे सर्व फॅब ढोलेरा येथे उभारण्यात येणार आहेत.
'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' - रुफटॉप सोलर स्किमसाठी कसा अर्ज कराल?- pmsuryagarh.gov.in या वेबसाइटवर Apply For Rooftop Solar वर क्लिक करा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.- सर्वात आधी तुमचं राज्य निवडा.- त्यानंतर तुमच्या इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनीची निवड करा.- तुमचा वीज ग्राहक क्रमांत टाका.- मोबाईल नंबर टाका.- ईमेल टाका.- पोर्टलवर दिलेल्या सुचनांनुसार फॉलो करा.- पुढे ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबरसह लॉग-इन करा. त्यानंतर फॉर्मनुसार, रुफटॉप सोलरसाठी अर्ज करा.- त्यानंतर डिस्कॉमकडून फिजिबिलिटी अप्रुव्हलची वाट पाहावी लागेल. एकदा अप्रुव्हल आल्यानंतर डिस्कॉममध्ये कोणत्याही रजिस्टर्ड विक्रेत्याकडून प्लान्ट इन्स्टॉल करू शकता.- मीटर इन्स्टॉलेशन आणि डिस्कॉमकडून झालेल्या इन्स्पेक्शनसह पोर्टलकडून कमिशनिंग सर्टिफिकेट दिलं जाईल.- कमिशनिंग सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि कॅन्सल चेक जमा करावा लागेल. त्यानंतर ३० दिवसांच्या आत बँक खात्यात सब्सिडी दिली जाईल.