- संजय शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात संसद भवनात झालेल्या प्रदीर्घ भेटीनंतर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची पहिली फेरी संपल्यानंतर पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करू शकतात.
अदानी आणि शेअर बाजाराच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. संसदेचे कामकाज तहकूब होऊनही पंतप्रधान मोदी आणि शहा सकाळपासून संध्याकाळपर्यंत संसद भवनात उपस्थित राहिले. दरम्यानच्या काळात मोदी यांच्या चेंबरमध्ये दोघांत राजकीय विषयांवर चर्चा झाली.
जानेवारीतच मोदी मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा होती. मात्र, तसे काही न झाल्याने चर्चा थंडावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील दीर्घ बैठकीनंतर याबाबतची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची पहिली फेरी १३ फेब्रुवारीला संपत आहे, त्यामुळे त्यानंतर कधीही मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो, असे मानले जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची घाई करण्यामागे अनेक राजकीय कारणे आहेत. त्याशिवाय भाजपला अनेक राज्यांत निवडणूक मोडमध्ये येणे शक्य नाही, तसेच अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षही बदलावे लागणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही त्यांची नवी टीम तयार करावी लागणार आहे. कर्नाटकात एप्रिलमध्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने ही वेळ योग्य मानली जात आहे.
कोश्यारींसह चार राज्यांचे राज्यपाल बदलणार ?पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्यात शुक्रवारी अनेक राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली असून, त्यात महाराष्ट्रासह चार राज्यांच्या राज्यपालांच्या नावांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लवकरच या नियुक्त्या जाहीर केल्या जातील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपद सोडण्याची इच्छा जाहीरपणे प्रदर्शित केली आहे. तेव्हापासून महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांच्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू आहे.