बिहारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 05:03 AM2023-07-17T05:03:20+5:302023-07-17T05:04:03+5:30
तीन ते चार जणांना मिळू शकते संधी
एस. पी. सिन्हा
पाटणा : बंगळुरूत होणाऱ्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत भाग घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार याच आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात. हा विस्तार २१ किंवा २२ जुलै रोजी होऊ शकतो, अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारात तीन ते चार नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाईल. दोन मंत्री राजदच्या कोट्यातून तर एक किंवा दोन मंत्री काँग्रेसच्या कोट्यातून घेण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची काँग्रेसकडून दीर्घ काळापासून मागणी करण्यात येत आहे.
काँग्रेसने दोन मंत्रिपदे मागितली आहेत. मात्र, राजदने काँग्रेसला एकच मंत्रिपद द्यावे, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. राजदचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव काँग्रेसला दोन मंत्रिपदे देण्याच्या विरोधात आहेत. सध्या काँग्रेसचे दोन मंत्री आहेत. एकीकडे काँग्रेसला किती मंत्रिपदे द्यायची, यावर अद्याप अंतिम सहमती झालेली नाही तर दुसरीकडे कोणाला मंत्रिपद द्यावे यावरून काँग्रेसमध्येही गोंधळाची स्थिती आहे. जर पक्षाला एकच मंत्रिपद मिळाले तर वैश्य समाजातील नेत्याला मंत्रिपद दिले जाऊ शकते. एक सवर्ण आणि एक अन्य जातीतील नेत्याला मंत्री बनवता यावे यासाठी काँग्रेसने दोन पदांची मागणी केली आहे. मात्र, आता एकच मंत्रिपद मिळण्याची चिन्हे असल्याने कोणाला मंत्री करावे, असे आव्हान पक्षासमोर निर्माण झाले आहे. दुसरीकडे राजदकडून ज्या दोन नेत्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे त्यात एक भूमिहार आणि एक राजपूत समाजातील असेल, असे सांगण्यात येते.