नवी दिल्ली - कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी गुरुवारी आपल्या कॅबिनेटचा मंत्रीमंडळ विस्तार केला. या विस्तारात काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या 11 पैकी 10 जणांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. त्याचवेळी पक्षातील निष्टावंत नेत्यांना डावलण्यात आले आहे.
कर्नाटक मंत्रीमंडळात एमसी सोमशेखऱ, लक्ष्मण राव, आनंद सिंह, के. सुधारकर, एचए बसावरजा, अराबली हेब्बर शिवराम, बसवानगोडा पाटील, के. गोपालैया, नारायण गोड्डा आणि श्रीमंत बालासाहेब पाटील यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार काँग्रेस आणि जीडीएस सोडून भाजपमध्ये सामील झाले होते. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळले होते.
येडियुरप्पा यांनी मंत्रीमंडळ विस्तारात सामील होणाऱ्या आमदारांसंदर्भात आधीच संकेत दिले होते. काँग्रेस आणि जेडीएस युती तुटल्यानंतर भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या 10 आमदारांना मंत्रीमंडळात सामील करण्यात येईल. सुरुवातीला त्यांनी भाजपमध्ये आलेल्या सर्व आमदारांना मंत्रीपद देण्याचे म्हटले होते. मात्र ऐनवेळी 11 पैकी 10 जनांना संधी देण्यात आली.
मागील अनेक दिवसांपासून कर्नाटकमधील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. या संदर्भात येडियुरप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अनेक दिवसांपासून चर्चा करत होते.