Rajasthan Ministers Resignation: राजस्थानमध्ये आज मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा दिला आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद मिटला असल्याचे सांगण्यात येत असून आज, रविवारी राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये 15 नेत्यांना शपथ दिली जाणार आहे. यामध्ये 11 कॅबिनेट मंत्री असणार आहेत. ज्यामध्ये 8 नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहेत. तर तीन राज्य मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बडती देण्यात आली आहे. याशिवाय, चार नेत्यांना राज्य मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
ममता भूपेश, टीका राम जूली आणि भजन लाल जाटव यांचं प्रमोशन झालं आहे. राज्यमंत्री पदावरुन कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली आहे. हेमा राम चौधरी आणि रमेश मीणा यांना सचिन पायलट गटाकडून मंत्रिपद देण्यात आलं आहे. बृजेंद्र ओला आणि मुरारी मीणा यांना सचिन पायलट गटातील राज्यमंत्रिपद देण्यात आलेय. राजेंद्र गूढा यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. बीएसपीमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सहा आमदारांपैकी गूढा एक आहेत. विश्वेंद्र सिंह यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलेय. याशिवाय रमेश मीणा यांना पुन्हा कॅबिनेटपद मिळालं आहे.
मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांच्या निवासस्थानी शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा देखील जयपूरला पोहोचले आहेत. नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांबाबतही सहमती झालेली असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये 2023 मध्ये निवडणुका होणार असल्या तरी, गेहलोत आणि पायलट गटात सुरू असलेली भांडणे ज्या मर्यादेपर्यंत पोहोचली आहेत, ते पाहता गांधी घराणे जास्त सक्रिय झाले आहे. गेल्या वर्षी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. पायलट आणि त्यांच्या 19 समर्थक आमदारांनी ही बंडखोरी केली होती. सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. राजस्थान हे काँग्रेसच्या हातात असलेलं मोठं राज्य आहे. या राज्यात भाजप पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर सचिन पायलट यांनाही मुख्यमंत्रीपदाची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.